मुंबई :  राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विषयी या अहवालात दिलेल्या माहितीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  राज्यात भाजप सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शुक्ला यांनी राजकीय हेतूने गैरवापर केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी केला आहे. या अहवालावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी लिहिला असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. त्या टिकेला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.


अहवाल कुणी बनवला? रंगला कगलीतुरा, फडणवीसांचा गंभीर आरोप तर आव्हाडांचं खोचक उत्तर


फोन टॅपिंग प्रकरणी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेला अहवाल हा मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी तयार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांची नाव न घेता टीका केली आहे. 


 






रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या : जितेंद्र आव्हाड


राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही 'अनुभवी' नेत्याचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांनी आरोप केला तरी महाविकास आघाडी सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.


रश्मी शुक्ला यांच्यावर अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता : सूत्र


त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक असून महाविकास आघाडी सरकार बदनाम करण्यासाठी फोन टॅपिंगचे षडयंत्र रचण्यात आले का अशी शंका अहवालावरून येते असेही मत देखील रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले.


एकूणच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे नाव न घेता टीका केली आहे आणि महाविकास आघाडी सरकारची पाठराखण केली आहे.