Amol Mitkari : ईडीचे पाहुणे संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पाठवून भाजपनं राज्यपालांचा राजीनामा वाचवला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबवण्याकरता भाजपानं ही नवी खेळी केली असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन तसेच शेतकऱ्यांना अजुनही भरीव मदत मिळाली नसल्यानं सरकारविरुद्ध असलेल्या रोषावरून चर्चा भरकटली पाहिजे म्हणून भाजपानं ईडीचा सुनियोजत कट रचला असल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय.


अपेक्षेप्रमाणं ईडी नावाचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आहेत. एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली आहे. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील. मात्र, राऊत ईडीला घाबरुन भाजपला शरण गेले नसल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


सरकार बेकायदेशीर ठरले तर राष्ट्रपती राजवट लागेल


महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. 1 ऑगस्ट ऐवजी 3 ऑगस्टवर गेला आहे. न्यायालयाचा निकाल काहीही आला तरी तो भाजपच्याच पथ्यावर पडेल. सरकार बेकायदेशीर ठरले तर राष्ट्रपती राजवट लागेल. दुसरा कोणताही पक्ष सरकार स्थापन करु शकणार नाही. राष्ट्रपती राजवट आल्यावर प्रशासक राज्यपाल नेमतील तो "भाजपवालाच" असेल. विधान परिषदेच्या 12 आमदारांची प्रलंबित यादी राज्यपाल झटकन मंजुर करतील ते बाराही आमदार "भाजपवालेच"असतील आणि शिंदे गटाच्या बाजूने निर्णय गेला तरी सरकारवर वर्चस्व "भाजपचेच" असेल, असेही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.


सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूला खंबीरपणे उभा


कुठलीही ताकद लावली असती तरी फडणवीस शिवसेना फोडू शकले नसते, म्हणून हे काम एका ठराविक गटाकडून सुप्त पद्धतीनं केंद्रीय स्तरावरून सुरु झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन बॅनरवर मोदी, शाह, नड्डा झळकू लागले आहेत. केवळ सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूला खंबीरपणे उभा असल्याचे मिटकरी म्हणाले. सद्यस्थिती देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येऊन वेळ प्रसंग पडला तर अपमानही पचवून घेत आहेत. सर्व प्रकरणात भाजपचा तिळमात्र तोटा होणार नाही. शिंदे गटाच्या माध्यमातून  शिवसेनेची तोडफोड करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरु आहे आणि हे सर्व दिल्लीवरुन ठरले असल्याचे मिटकरी म्हणालेत.


महत्वाच्या बातम्या: