Wardha Blast : वर्धा शहरातील वंजारी चौकात असलेल्या वंजारी यांच्या घरी कोणी नसताना मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की संपूर्ण परिसर हादरला आणि नागरिकांना धडकीच भरली. धावाधाव झाली आणि कळलं की वंजारी यांच्या घरात हा स्फोट झाला, या स्फोटामुळे घराची भिंत कोसळली. इतकंच नाही तर घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं. जवळच्या दुकानाच्या काचाही फुटल्या. अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्वरित अग्निशमन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र विशेष म्हणजे घरातील गॅस सिलेंडर आणि फ्रिजचे कॉम्प्रेसरदेखील व्यवस्थित असताना हा स्फोट झाला कशाचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


कुटुंबीय घरी नसल्याने जीवितहानी टळली
 
वंजारी चौकातील या स्फोटात घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त झाल्या, सुदैवाने घरी कुणी नसल्याने जीवितहानी टळली. शहरातील वंजारी चौक हा सतत वर्दळीचा परिसर आहे. याचं परिसरात सुरेश वंजारी यांचं घर आहे. घराच्या खालच्या मजल्यावर सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, वरच्या मजल्यावर ते राहतात. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात स्फोट झाला. दरम्यान, घरातील सर्व मंडळी बाहेर फिरायला गेली होती. त्यामुळे घर बंद होतं. सुरेश यांची पत्नी रजनी वंजारी या सायकल दुरुस्तीच्या दुकानात बसल्या होत्या. अचानक स्फोट होऊन भयानक आवाज झाला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक वंजारी यांच्या घराकडे धावले. स्फोटामुळे समोरील दुकानालाही तडा गेल्या. 


नेमका स्फोट कशाचा; परिसरात बघ्यांची मोठी गर्दी 
 
सिलेंडर लिकीज होऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. स्फोटात घरातील स्वयंपाक खोलीतील सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वस्तू अस्ताव्यस्त झाल्या भिंत पडली, काच तुटल्या. घराची पाहणी करण्यात आली. मात्र सिलिंडर शाबूत, आणि फ्रिजही व्यवस्थित होता. तर मग हा स्फोट नेमका कशाचा हे कळू शकलेलं नाही. घटनास्थळी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक चमूला पाचारण करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक चमूंकडून तपासणी सुरू होती. स्फोटाचा आवाज एक किमीपर्यंत आल्याने बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.