सोलापूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि अनेक नेते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आराम करण्याऐवजी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेले. आज शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली.


सांगोलामधील यलमार मंगेवाडी येथील शेतकऱ्यांशी पवारांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. केवळ पाच जनावरांनाच चारा छावणीत प्रवेश मिळतो, रोज फक्त 15 किलोच चारा दिला जातो अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी शरद पवारांनी दिलं. दोन हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या यलमार मंगेवाडी गावातील दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे.


दरम्यान आज राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचं निधन झाल्यानं शरद पवारांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. शरद पवारांचा आज सांगोला, मंगळवेढा, सोलापूर आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा होता. मात्र आज दुपारी अजनाळे येथे त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा पूर्ण होत असताना डोळस यांच्या निधनाची बातमी आली. त्यानंतर शरद पवार यांनी आपला दौरा रद्द करण्याच निर्णय घेतला.


सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक आमदार आज आपल्यात नाही. काल मुंबईत रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती, ते पुन्हा आपल्यासोबत येतील अशी आशा होती. मात्र परिस्थिती गंभीर होती, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.


आज मंगळवेढा, सोलापूर आणि उद्या उस्मानाबादला दुष्काळ पाहण्यासाठी जाणार होतो. मी आतापासून माझे सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.