Sharad Pawar On New Parliament : संसद भवनाच्या नव्या इमरतीच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगलेला असताना विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. आजचा संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. मला समाधान वाटतं की मी गेलो नाही, असं ते म्हणाले त्यासोबतच राज्यसभेच्या अध्यक्षांना या कार्यक्रमात का डावललं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, मी त्या ठिकाणी गेलो नाही याच समाधान आहे. जे कर्मकांड सुरू होतं त्याच्यावरून असं दिसतंय की, नेहरू यांनी आधुनिक लोकशाहीची जी संकल्पना मांडली, पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे. नेहरू यांनी जी संकल्पना मांडली ती आणि आताची परंपरा फार वेगळी आहे. त्यावरुन आपण मागे चाललो आहोत का? असा प्रश्न पडत आहे, असंदेशील त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्यांनादेखील या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना कार्यक्रमासाठी बोलवायला पाहिजे होतं. यावरुन हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. देशातील महत्वाच्या इमारतीचं म्हणजेच संसद भवनाच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना समाविष्ठ करुन घेतलं असतं. तर ते देशासाठी चांगलंच झालं असतं शिवाय विरोधकांसाठीदेखील ती बाब चांगली ठरली असती. मात्र संसदेच्या जुन्या इमारतीसोबत आमची बांधिलकी आहे, असं देखील ते म्हणाले.
माझ्या घरापर्यंत मंत्र्यांचे पत्र आलं असेल पण...
देशातील महत्वाच्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील सगळ्या विरोधीपक्षांच्या नेत्यांना गृहीत धरलं गेलं नाही का? असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, देशातील विरोधीपक्षांना निमंत्रण दिलं की नाही, याची मला फार माहिती नाही. मात्र मला निमंत्रण आलं नाही. कदाचित माझ्या दिल्लीच्या घरापर्यंत मंत्र्यांचं पत्र आलं असेल पण माझ्या हातात आलं नाही. मात्र हा सोहळा नियोजन करून करायला पाहिजे होता, अशी टीका त्यांनी केली आहे.
'ती' भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते...
या संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन विरोधक राजकारण करत आहे. मात्र त्यांना जनता जमालगोटा देईल म्हणजेच त्यांना धडा शिकवेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात केलेल्या भाषणात म्हटलं. त्यावर शरद पवारांनी टोला लगावला आहे. जमालगोटाची भाषा ही मुख्यमंत्र्यांनाच जमू शकते, अशी भाषा फक्त त्यांनाच शोभते, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Supriya Sule : विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच, संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे