बीड : रेशन दुकानावरील नोंदीचे काम केल्यानंतर दारूच्या दुकानासमोरची माहिती गोळा करायचे काम सुद्धा शिक्षकांनी यापूर्वी केले आहे. आता चक्क शिक्षकांना किराणामालाची होम डिलिव्हरी देण्याचे काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये सोपवण्यात आले आहे.
पाटोदा तालुक्यातील 51 शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'ची कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचण्याचे काम दिले आहे. मात्र शिक्षकांना असे काम देणे योग्य नाही. हा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
पाटोदा नगरपंचायत परिसरातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल यासोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी काम लावण्यात आले आहे.
या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीच बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी कुणी रेशन दुकानासमोर बसून रेशनचा किती वाटप झाली आहे, याच्या नोंदी घेतल्या होत्या. तर अनेक शिक्षकांनी पोलिसांसोबत चेक पोस्टवर बाहेरगावावरून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवायचं काम केलं होतं.
दरम्यान पाटोदा तालुक्यातील किराणा दुकानाचे सगळी माहिती ऑनलाईन होणे बाकी आहे. त्यामुळे अद्याप कुणी शिक्षक थेट डिलिव्हरी घेऊन लोकांच्या घरी गेले नसले तरी या निर्णयाच्या विरोधात मात्र मराठवाडा शिक्षक संघाच्या शिक्षकांनी तक्रार केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.