Aurangabad News Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जात आहे. परंतु, राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.  


जयंत पाटील यांनी आज औरंगाबाद येथे माध्यमांसोबत संवाद साधला. "विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. परंतु, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या पुढाकाराने राज्यात हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठण करणार असे आव्हान दिले होते. त्यानुसार राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईत आले. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर या दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


खार पोलिसांनी काल त्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. हाच मुद्दा पकडून भाजपचे अनेक नेते राज्यात राष्ट्रपती राजवट  लावण्यात यावी अशी मागणी करत आहेत. काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी केली आहे.  


विरोधक राज्यात राष्ट्रपती लाजवट लावण्याची मागणी करत असले तरी राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विरोधकांच्या या मागणीवर टीका केली आहे. "राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही, असे माजी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. कायद्यानुसार राज्य चालत नाहीत हे दाखवावं लागतं. ते काम राज्यपालांचं असून राज्यपाल काय लिहितील यावर माझा विश्वास आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Narayan Rane : राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे : नारायण राणे