Ajit Pawar : युवा पिढीने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे. बारामतीतील एका जीमच्या उद्घाटन प्रसंगी हा अजित पवारांनी सल्ला दिला आहे. गेल्या काही वर्षापासून आपले आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाने संपूर्ण राज्याला दाखवून दिले. त्यामुळे आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे मी देखील मी सुद्धा माझं मास्क घातलेलं दिसत आहे, असंही ते म्हणाले.


यावेळी अजित पवार म्हणाले की, डॉक्टरांनी देखील आवाहन केल आहे की तुम्ही मास्कचा वापर करा, गर्दी टाळा आपल स्वतः चं आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही पिढीला व्यसनं लागतात. ती व्यसनं शरीराला, प्रकृतीला घातक आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना स्पर्श देखील होऊन द्यायचा नाही असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे असे त्यांनी म्हटले. हा सगळा प्रयत्न करत असताना आपले सगळ्यांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. त्यामुळे असं जाहीर भाषणात सांगून प्रयत्न होत नसतात. आपल्या आहारावर देखील नियंत्रण असले पाहिजे. रोज नियमित व्यायाम केला पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी बारामतीकरांना दिला.


आरोग्याच्या बाबतीत अजित पवार फार काटेकोर असतात. त्यांनी यापूर्वीदेखील अनेकदा तरुणांना व्यसन करु नका असे सल्ले दिले आहेत. ‘आयुष्य पुन्हा मिळत नाही असं म्हणत अनेक तरुण बरीच व्यसनं करतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. म्हणून त्यांना एकच सांगणं आहे की, व्यसनांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करुन घेऊ नका.’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. ‘व्यसनामुळे आर. आर. पाटील यांच्यासारखा हवाहवासा वाटणारा नेताही आज आपल्यात नाही.’ अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. ‘विद्यार्थ्यांनी आयुष्यात योग्य मित्र निवडावेत. एखादा मित्र चुकीचा असेल तर आपलं पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. तुम्ही सतत कार्यमग्न राहिले पाहिजे. अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष द्या. तुम्हाला जर कुणी सांगितलं की, आयुष्य एकदा मिळतं हे खाऊन बघ, पिऊन बघ तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. मी माझ्या आयुष्यात यातील एकही गोष्ट कधीही केलेली नाही.' असंही अजित पवार म्हणाले होते.


संबंधित बातमी-

Pune Bypoll : पुण्याचे खासदार ठरले? जगदीश मुळीक यांची भावी खासदार म्हणून उल्लेख असलेली बॅनरबाजी; राष्ट्रवादीने घेतला समाचार