Pune Bypoll : खासदार गिरीश बापट यांच्या (Girish bapat) निधनांनतर रिक्त जागी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. त्यात आता भाजपकडून निवडणुकीसाठी काही प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. गिरीश बापटांच्या जागी उमेदवार म्हणून पाच नावांची चर्चा आहे. त्या पाचही जणांनी पुण्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे.


पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देणार मात्र या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. शिवाय त्यांनी पुण्यातील इतर विषयांवरदेखील केंद्रीय स्तरावर नाव कमवलं आहे. त्यामुळे यापैकी भाजप नेमकी कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


उमेदवार निवडीचं आव्हान...



गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका झाल्या तर भाजप आणि महाविकास आघाडी समोर उमेदवाराची निवड हे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभेच्यावेळी देखील दोन्ही पक्षासमोर उमेदवार निवडीचं आव्हान होतं. त्यानंतर भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. विरोधकांचा उमेदवार पाहून पक्षाने रणनिती आखली होती. मात्र जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत राजकीय हालचाली संथगतीने सुरु होत्या. त्याच प्रमाणे यावेळीदेखील चित्र बघायला मिळू शकतं. त्यात भाजपकडून काही नावांची चर्चा सुरु झाली आहे आणि ही जागा कॉंग्रेसची असल्यामुळे कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीकडूनदेखील काही नावांची चर्चा आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून नेमका कोणता उमेदवार दिला जातो त्यात जात आणि धर्मानुसार उमेदवार ठरु शकतो का?, हे पाहणं महत्वाचं असेल.


पोटनिवडणूक जाहीर झाली तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. मात्र गौरव हे राजकारणात फार सक्रिय नाहीत त्यामुळे स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. बापटांच्या घरी उमेदवारी दिली तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असा अंदाज आहे.