Ajit Pawar : आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं (Vedanta Foxconn) राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत, असं ऐकलं आहे. दिल्लीत त्यांनी बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी मागण्या असल्याचे अजित पवार म्हणाले. 


दोघांचेही मेळावे व्हावेत


दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट कोर्टात जावं असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काही वेळेस उच्च न्यायालयात जाऊन देखील परवानग्या घेतल्या आहेत. मागे कोरोनाच्या काळात ते घडलं आहे. बीकेसीत शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. त्यांना ती जागा मिळाली असली तरी इकडची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावी. दोघांनी मेळावे घ्यावे, दोघांचे विचार राज्यानं ऐकावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. त्यांनी त्यांचे नाव घेतलं तर त्यात गैर काय आहे. आम्ही सुद्धा यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत.  काँग्रेस गांधी-नेहरु घराण्याचे विचार पुढे घेऊन जात आहे. आपण आपल्या पूर्वजांचे नाव घेतले तर त्यात काय चुकलं काय. त्यांची पुण्याई त्यांनी सांगितलं तर त्यात गैर काही नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील (Juhu Adhish Bunglow) अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात न्याय व्यवस्थेला अंतिम मानतो. जर एखाद्याला निर्णय योग्य वाटला नाही तर ते पुढे अपील करु शकतात. जे त्या जागेचे मालक आहेत तेच यासंदर्भात बोलतील. त्यांना मुंबई पालिकेने पत्र दिलं आहे. पण आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी कायद्याने, संविधानाचा मान राखला पाहिजे असे अजित पवार म्हणाले. 


एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, यासाठी सरकारनं लक्ष द्यावं


मी सरकारमध्ये असताना एसटीसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, सध्या एस टी ला स्वतःच्या उत्पन्नातून पगार मिळेल अशी परिस्थिती राहिली नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, यासाठी सरकारनं बारकाईने लक्ष द्यावं असेही अजित पवार म्हणाले. 


ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा


ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत. जी आकडेवारी दाखवली त्यामधे महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा आहेत हे देखील सत्य आहे. आगामी निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. सहकारातील निवडणुका लवकरच लागतील. त्यांना सप्टेंबरपर्यंत स्थगिती होती. मात्र, आता या निवडणुका होतील असे अजित पवारांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: