Satara Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. अशातच आता सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. महाबळेश्वरसह (Mahabaleshwar) वेण्णा (Venna) लेक परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. अचानक तिथला पारा घसरला आहे. वेण्णा लेकमध्ये तापमानाचा पारा सहा अंशावर तर महाबळेश्वरचा पारा नऊ अंशावर गेला आहे.
दरम्यान, अचानक तापमानाचा पारा घसरल्यामुळं पर्याटकांसह स्थानिकही चांगलेच गारठले आहेत. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याचा अनुभव येत आहे. दरम्यान, एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat wave) शक्यता भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.
एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, पुढील 2 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. जरी काही भागात ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.
6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत राज्याच अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील ( बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील 4 जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे. आजपासून संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: