Jayant Patil On Obc Reservation : ओबीसी आरक्षणावरुन सध्या वातावरण तापलं असताना आता राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाचा निर्णय आहे जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत असा आहे. 


जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणचा निर्णय सध्या चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हा प्रश्न पुन्हा तयार झाला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे दोन्ही निर्णय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर बदलले. याच्यामागे काय होतं. कोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय अडवण्याची पद्धत सुरु आहे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचं आणि नवे प्रश्न तयार करायचे. या सरकारला काम करायला अडथळे निर्माण करायचे. विशेषता ओबीसी समाजात गैरसमज पसरवायचे. सध्या महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये केवळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे, असा आरोप त्यांनी केला. 


ते म्हणाले की,  ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यावरच निवडणुका व्हाव्यात हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टात हा निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी दिल्लीत यासंदर्भात बैठका घेतल्या. सुप्रीम कोर्टाला मुद्दा पटवून देण्यासाठी आणखी काय करता येईल याचा मार्ग ते शोधत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस तेवढीच संवेदनशील आणि आग्रही आहे. मराठा आरक्षणासाठीही राष्ट्रवादी संवेदनशील आणि आग्रही आहे. मुस्लिम आरक्षणासाठीही आमचा आग्रह आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 


देशात केंद्र सरकारच्या विरोधी कुणी बोललं तर हे नवाब मलिक यांनी सांगितलेले पाहुणे आपल्या घरी येतात. तुम्ही सतत बोलत आहात तर पाहुणे येतात. काही नाही बोलले तर पाहुणे दुर्लक्ष करतात. तुम्ही त्यांच्यात जाऊन बसलात तर ते तुमचं स्वागत करतात, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला. 


दरोडेखोर देखील एखाद्या घरावर दरोडा घातल्यावर पुन्हा त्या घरी येत नाही. मात्र अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयनं सात वेळा धाडी टाकल्या. महाराष्ट्रात आणि देशात याविरोधात कुणीतरी वाचा फोडायला हवी होती. त्याला नवाब मलिकांनी वाचा फोडली. विरोधकांनाही सन्मानानं वागवायचं असतं. विधायक कामात वादविवाद होऊ शकतो मात्र वैयक्तिक टार्गेट केलं जातं आहे हे दुर्दैव आहे, असं जयंत पाटील म्हणाले. प्रसारमाध्यमांवर देखील करडी नजर असते, असंही ते म्हणाले.