सोलापूर : स्वायत्त संस्था असलेली ईडी भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झालं आहे. विरोधी पक्षांशी सल्लामसलत करुन महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते सोलापुरातील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे ते विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन होतंय असा आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. सोलापुरातील एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पवार साहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे, इथल्या अनेक विषयांत ते स्वतः लक्ष देतात असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
बँकिंगसंबंधी निर्बंधावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. बँकिंगशी संबंधित कामकाजावर रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर अनेक निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधावर चर्चा करण्यासाठी शरद पवार दिल्लीला गेल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातून शरद पवारांना अनेक पत्रे येऊन या संबंधी पंतप्रधानांची भेट घेऊन काही तोडगा काढावा अशी विनंती करण्यात येत होती असंही ते म्हणाले.
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पण आपण त्याबाबत गाफिल राहतोय असं दिसतंय.राज्यात लसीचा साठा कमी पडतोय. केंद्र सरकारने आधीच्या आरोग्यमंत्र्याना बाहेरचा रस्ता दाखवला म्हणजे कोरोनाच्या काळात केंद्र स्तरावर काम झालं नाही. महाराष्ट्राने मात्र चांगले निर्णय घेत, कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली."
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर जयंत पाटलांनी गर्दी कमी करावी आणि परवानगी नसलेल्या लोकांनी बाहेर जावं अशी सूचना केली.
महत्वाच्या बातम्या :