नवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम अद्याप सुरु असून 2022 पर्यंत सर्व सीमा या बंदिस्त करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ते बीएसएफच्या 18 व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होतं. यावेळी बीएसएफच्या ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांच्या कार्याला अमित शाह यांनी सलाम केला. वीर पुरस्काराचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. हे जवान सीमेवर सजग असून सुरक्षा करत असल्याने आपण सुखाने जगत असतो. त्यांच्यामुळेच आजही भारतात लोकशाही नांदत आहे आणि तिचा विकास होत आहे. त्यांच्या या बलिदानाला कधीही विसरु शकत नाही. बीएसएफच्या आणि इतर पॅरामिलिटरीच्या या लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याने आज भारताने जागतिक नकाशावर एक गौरवमय स्थान निर्माण केलं आहे."
अमित शाह पुढे म्हणाले की, "सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत, पण मला आपल्या पॅरामिलिटरी जवानांवर पूर्ण विश्वास आहे. घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी, ड्रोन हल्ला असे अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. पण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत."
सीमा सुरक्षा बलाचा हा पुरस्कार सोहळा 2003 पासून साजरा करण्यात येत आहे. बीएसएफचे पहिले महानिदेशक आणि पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित केएप रुस्तमजी यांच्या जन्म दिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. यावर्षीच्या 18 व्या पुरस्कार सोहळ्यात एकूण 27 पुरस्कार देण्यात आले असून त्यामध्ये 14 वीरता पुरस्कार आणि 13 पोलीस पदकं प्रदान करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा
- UGC Guidelines 2021 : 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु; UGC चे महाविद्यालयांना निर्देश
- Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; स्पर्धेच्या ठिकाणी सापडला कोरोनाचा रुग्ण