मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीला हजर राहिलेल्या सर्व नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढून हा आदेश जारी केला आहे. रविवारी, 2 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.
शपथविधीला उपस्थित राहून हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येय धोरणे यांच्या विरोधात आहे. त्यामुळे ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी संगत नाही आणि त्यामुळे ही बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येत आहे असं राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटलं आहे.
बडतर्फ केलेल्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह वापरता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या पत्रात करण्यात आले आहेत.
आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या
कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पक्षात झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावली असून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
जितेंद्र आव्हाडांचा व्हिप सर्वांना लागू
जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन सांगितलं की, पक्षाने ठरवलेला व्हिप हा अंतिम असतो, आणि जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादीचे व्हिप असतील. मी त्यांना जो आदेश देईन आणि ते जे सांगतील ते सर्व आमदारांना लागू होईल.
ज्या वेळी या नऊ जणांनी शपथ घेतली त्याच वेळी ते अपात्र ठरले असून यासंबंधित पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, महाराष्ट्रात या आधी असं कधीही झालं नव्हतं. या आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
ही बातमी वाचा: