मुंबई: जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय.
शिंदे गटाचा न्याय दादांच्या राष्ट्रवादीला
राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.
जो न्याय शिंदेच्या शिवसेनेला दिला तोच निर्णय अजित पवारांच्या गटाला देण्यात आला असून निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिला. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र्य गट म्हणून मान्यता दिली आहे.
बुधवारी 4 वाजेपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना
अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना ही बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे.
शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा
शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांसोबत
- महाराष्ट्रातील ४१ आमदार
- नागालँडमधील ७ आमदार
- झारखंड १ आमदार
- लोकसभा खासदार २
- महाराष्ट्र विधानपरिषद ५
- राज्यसभा १
शरद पवारांसोबत
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा - ३
पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे