नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर (NCP Crisis) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) 12 आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणीची शक्यता आहे.
शरद पवारांना तुतारी चिन्ह
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. त्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला.
घड्याळावर दावा करणार की तुतारी कायम ठेवणार?
काही दिवसांपूर्वी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना शरद पवार म्हणाले होते की, चिन्हाच्या संबंधी प्रश्न उपस्थित करणार नाही. पण तुतारी आणि पिपाणी यावर काहीतरी तोडगा काढावा लागणार. कारण त्याचा फटका आम्हाला नाशिक आणि साताऱ्यामध्ये बसला. घड्याळ्याचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे, सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी न्यायालयाच्या सूचना पाळल्या पाहिजेत असं शरद पवार म्हणाले.
विधानसभेलाही तुतारी चिन्हावर लढावे लागण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाचे यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
शरद पवारांना मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या आधीच व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
ही बातमी वाचा: