महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला? सेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद?
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2019 10:41 AM (IST)
सत्तास्थापनेच्या दिशेने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आला आहे. काल काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत सरकारस्थापनेचा फॉर्म्युला तसेच त्याच्या अटीशर्तींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : सत्तास्थापनेच्या दिशेने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री (12 नोव्हेंबर)काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत सरकारस्थापनेचा फॉर्म्युला तसेच त्याच्या अटीशर्तींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाशिवआघाडीच्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. तर, काँग्रेसला 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते. असा असू शकतो महाशिवआघाडीचा फॉर्म्युला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला, तर 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहणार. महामंडळासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 14 मंत्रिपदे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज वाय. बी. सेंटरमध्ये वरिष्ठ नेते आणि आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये पुढची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देऊनही वेळेत सरकार स्थापन करता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. संबंधित बातम्या : मित्रपक्षाच्या हट्टामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट - सुधीर मुनगंटीवार राष्ट्रपती राजवट लागू करणारे कोश्यारी आहेत तरी कोण? संघ अन् भाजपशी काय आहे नातं राज्यपाल दयावान माणूस, 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत दिली; उद्धव ठाकरेंचा टोला