मुंबई  : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. राज्याचे राज्यपाल दयावान माणूस आहे म्हणून त्यांनी 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत आम्हाला दिली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपची सत्तास्थापनेची मुदत संपण्यापूर्वी आम्हाला सत्तास्थापनेसाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला. काल आम्ही राज्यपालांना भेटुन हीच विनंती केली होती की, आम्ही सत्तास्थापन करु इच्छीतो त्यासाठी आम्ही 48 तासाची मुदत मागितली होती. पण 48 तास नाही तर सहा महिने मुदत दिली असे राज्यपाल सर्व राज्यांना लाभावे असं उद्धव ठाकरे म्हणाले.


महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन करणे आणि ते स्थिरपणे चालवणे हा पोरखेळ नाही. त्याकरिता आम्हाला 48 तासांची मुदत पाहिजे होती, पण ती राज्यपालांनी दिली नाही. काल आम्ही प्रथम अधिकृतपणे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्क केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र बसू आणि मग कॉमन मिनिमम प्रोग्रामवर (Common Minimum Program) चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपने आमच्यासोबत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलं होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. भाजपचा पर्याय मी संपवला नाही तो त्यांनी संपवला आहे. लोकसभेतच्या वेळी सुद्धा मी एकटा चाललो होते. त्यावेळेस असा माहोल होता कि त्यांची केंद्रात सत्ता येणार नाही. अशा अंधारात मी त्यांच्या बरोबर गेलो असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आघाडी सोबत जाण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्याचं मी ऐकलं आहे. एक चांगला मित्र म्हणुन त्यांचा सल्ला ऐकतो अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी लगावली.


मी भाजपा आणि मुफ्ती मेहमुबा एकत्र कसे आले, ती विचारधारा कशी एकत्र आली तो सुद्धा करार मागवलेला आहे. नितीश कुमार आणि भाजपा कसे एकत्र आले, रामविलास पासवान आणि भाजपा कसे एकत्र आले, मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले होते.  या विचारधारा कोणत्या संगमावर एकत्र आल्या ही सगळी माहिती मी मागवली आहे. आणि ही माहिती एकत्र केल्यानंतर आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचे आम्ही ठरवू असे उद्धव ठाकरें म्हणाले.

तसेच हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. पण नुसत वचन द्याचं आणि ते पाळायचं नाही असं होणार नाही. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे.

Uddhav Thackeray | लिलावतीमध्ये उद्धव ठाकरे-आशिष शेलार यांची भेट टळली, हर्षवर्धन पाटील-उद्धव यांची भेट | ABP Majha