Ajit Pawar Vs Sharad Pawar NCP Crisis: गेली दोन दिवस राज्यात राजकीय घमासान सुरू आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. फरक इतकाच आहे की शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळाली, पण राष्ट्रवादी फुटली तेव्हा शरद पवारांना (Sharad Pawar) सहानुभुतीसोबत प्रश्नचिन्ह मिळालंय. राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे का असा प्रश्न रविवारपासून प्रत्येकाच्या मनात डोकावतोय. 


एकूण 24 वर्षांचा पक्ष, 15 वर्षांची सलग सत्ता, शेकड्याने आमदार-खासदार, हजाराने पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्त्यांचं जाळं... हे सगळं एका दमात हिरावलं... तेही पुतण्यानं. पवार धक्क्यात असतील, पवार कोलमडले असतील असं अनेकांना वाटलं होतं. पण पवारांनी पत्रकार परिषदेत थेट लोकांमध्ये जाऊन संघर्षाची भाषा केली. 


पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रवादीच्या बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही? आणि त्याला कारणंही तशीच आहेत? 


कारण क्रमांक एक 


पक्ष फुटल्यानंतर दोनच तासांत पवारांनी पक्षाच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात जाणार नाही असं स्पष्ट केलं. अवघ्या पत्रकार परिषदेत पवारांनी अजित पवारांना एकदाही दुषण दिलं नाही. बंडखोरी, पक्षफुटी, गद्दारी यातला एकही शब्द पवारांच्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत नव्हता. पक्ष फुटल्यानंतर अनुभवी नेत्याचं शांत राहणं समजलं जाऊ शकतं. पण कायदेशीर लढाईला थेट नकार देणं प्रश्नचिन्ह निर्माण करणार होतं. 


कारण क्रमांक दोन 


राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही आपल्या भूमिकेत पवारांचाच कित्ता गिरवला. दोघेही अजित पवारांच स्थान मान्य करत राहिले. पक्ष फुटल्यानंतरही दादांची पाठराखण करण्याची इतकी धडपड का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


कारण क्रमांक तीन


छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे पवारांचे खास म्हणून ओळखले जातात. हे तीनही नेते एका क्षणात अजित पवारांसोबत जातात हे सहज मान्य होण्यासारंख नाही. दिलीप वळसे पाटील यांच्यामागे तर ईडीही नव्हती. मग फक्त वर्षभराच्या मंत्रीपदासाठी हे नेते दादांसोबत जातील हे फक्त प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. 


कारण क्रमांक चार 


एकीकडे अजित पवारांनी पक्षावर ताबा घेतोय असं दाखवलं. पण पक्षाध्यक्ष शरद पवारच राहतील हे स्पष्ट केलं. पवारांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष बदलले पण बॅनरवर पवारांचे फोटो ठेवले. दुसरीकडे कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळं फासलं. तर जितेंद्र आव्हाडांनी ते आपल्या हातानं पुसलं.. पक्ष फुटला असेल, वाटा वेगळ्या झाल्या असतील तर मग एकमेकांना सांभाळण्याची इतकी धडपड का?


कारण क्रमांक पाच 


राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्याची स्क्रिप्ट वर्षभर आधीच ठरली होती असा आरोप विरोधक करत आहेत. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बंडाला राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा आधीच सुरू झाली आहे आणि खुद्द जितेंद्र आव्हाड त्याला दुजोरा देत आहेत. मग विरोधकांच्या या बोलण्यात तथ्य आहे का?


कारण क्रमांक सहा


अजित पवारांची नाराजी आणि शरद पवारांचं राजीनामानाट्य यावरून राष्ट्रवादीत सगळं आलबेल नाही हे प्रत्येकाला कळत होतं. अशा परिस्थितीत पवारांनी संघटनात्मक नेमणूका केल्या. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं. पण या सगळ्याची नोंद पक्षाच्या घटनेत केलीच नाही. ती नंतर करू असं पवारांनी सांगितलं. पण या बदलांनंतर फक्त दहा दिवसांत पक्ष फुटतो आणि या नेमणुका कागदावरच राहतात. ही चूक म्हणायची की राजकीय खेळी?


पक्ष फुटल्यानंतर आता पक्षावर दावे सांगण्याच्या खेळी एकीकडे सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे लवकरच अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल अशीही चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादीला भविष्यात सरकारमध्ये काय स्थान मिळतं आणि 2024 च्या निवडणुकांना राष्ट्रवादी कशी सामोरी जाते यावरच दुपारच्या शपथविधीमागची कारणं आणि सूत्रधार स्पष्ट होतील.


ही बातमी वाचा: