नागपूर: महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भागामध्ये सध्या एक पत्रक लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलं आहे. या पत्रकामध्ये एका नव्या क्रांतीला सुरुवात करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण त्या क्रांतीची प्रेरणा आहे, थेट सीमेपलिकडील चीनमध्ये.

 

ज्या क्रांतीमुळे चीनमध्ये लक्षावधी लोक मारले गेले, ज्या क्रांतीमुळे रक्ताचे पाट वाहिले, ज्या क्रांतीने कोट्यवधी लोक विस्थापित झाले, ज्या क्रांतीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला. त्याच क्रांतीचे 50वे वर्ष महाराष्ट्रात साजरं केलं जाणार आहे.

 

चीनच्या तथाकथित सांस्कृतिक क्रांतीचा जल्लोष आपल्या भूमीवर साजरा होणार आहे आणि तोही नक्षल्यांकडून. नक्षली नेता गणपती यानं लिहिलेल्या पत्रामध्ये चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचे 50 वर्षे, रशियाच्या बोल्शेविक क्रांतीची शंभरी, कार्ल मार्क्सची जयंती आणि नक्षलबारी क्रांतीदिन साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

 

कायम बंदुकीची भाषा बोलणाऱ्या गणपतीने नक्षली चळवळीमध्ये प्राण फुंकण्यासाठी आता सोहळे साजरे करण्याचा फतवा काढला आहे. जास्तीत जास्त लढवय्या लोकांना क्रांतीमध्ये सामील करा, आपआपल्या भागात सशस्त्र मिरवणुका काढा. पण शहरात कायद्याच्या चौकटीत राहून मोर्चे काढा.

 

मजूर, शेतकरी, विद्यार्थी, विचारवंत, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यकांना सामील करा. सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्यासाठी त्यांना तयार करा. समविचारी संघटनांना यात सामील करून घ्या. पण या क्रांतीमध्ये डाव्या विचारसरणीच्या सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही पक्षांना मात्र सामिल करून घेऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे. खऱ्या मार्क्सवादापासून ते कोसो दूर असल्याचा दावा गणपतीचा आहे.