गडचिरोली : जिल्ह्यातल्या भामरागडच्या कुंडूरवाहीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी आज पोलिंसावर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिसांनीदेखील गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बारा लाखाचे बक्षीस असलेल्या रामको नरोटीसह शिल्पा धुव्रा या महीला नक्षलींचा मृत्यू झाला आहे.


गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला यश प्राप्त झाले आहे. आज भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कुंडुरवाही गावाजवळ जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी हा हल्ला नियोजित पद्धतीने परतवून लावला.

घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी घटनास्थळी मोठा भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. परंतु पोलीस दलाचा दबाव अधिक असल्याने नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चकमक संपल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या केलेल्या पाहणीत दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.

गट्टा दलम कमांडर आणि कुख्यात नक्षली रामको नरोटी हिचा यात मृत्यू झाला असून भामरागड दलम सदस्य शिल्पा धुव्रा ही अन्य एक महिला नक्षलवादी या चकमकीत ठार झाली आहे. रामको नरोटी गेली पंचवीस वर्षे नक्षल चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर 12 लाखांचे बक्षीस होते तर सुमारे पन्नासहून अधिक हिंसक कारवायांमध्ये रामकोचा थेट सहभाग होता.

दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नक्षलवाद्यांचे मृतदेह जिल्हा मुख्यालयी रवाना केले. सध्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरु आहे. काल नक्षल कमांडर दाम्पत्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते, तर आज एका दलम कमांडरला टिपण्यात पोलिसांना यश आल्याने गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान परिणामकारक ठरले आहे.