मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) त्यांना अटक झाली आहे. मलिकांवर सध्या कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू असून ते न्यायालयीन कोठडीतच तिथं उपचार घेत आहेत.
मलिक यांना न्यायालयाच्या आदेशानुसार, घाटकोपर येथील मेडिकल स्कॅन सेंटरमध्ये चाचणीसाठी नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचे अवयव निकामी झाल्याचं या चाचणीत निष्पन्न झाल्यानं डॉक्टरांनी मलिक यांना पुन्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मलिक हे मे महिन्यापासून मुंबईतील कुर्ला येथ एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. मलिक यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू असून एका आठवड्यानंतरच त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार पुन्हा मेडिकल स्कॅनसाठी नेण्यात येईल, अशी माहिती मलिक यांच्यावतीनं बाजू मांडताना अॅड. जानकी गर्दे यांनी मुंबई सत्र न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयानं सुनावणी 24 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
‘ईडी’नं दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यावेळी दाऊदच्या हस्तकांशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचं ‘ईडी’ला तपासात आढळलं. त्यानुसार ‘ईडी’नं कारवाई करत मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येकवेळी मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर मलिक यांनी आता नव्यानं जामीनासाठी अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून आपल्याविरोधात सबळ पुरावे दाखल करण्यात आलेले नसल्याचा दावा मलिक यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर मलिक यांच्यावतीनं युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शुक्रवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बाजू मांडणार होते. मात्र, शस्त्रक्रियेमुळे एएसजी सुनावणीसाठी हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयाली दिली.
संबंधित बातम्या :