मुंबई : शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. खरंतर देशभरात नवरात्रीचे रंग चढायला सुरुवात झालीय. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी ठिकठिकाणची मंदिरं सजली आहेत.


करवीर निवासिनी अंबाबाई

करवीर निवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कोल्लुर मुकांबिका रुपात पूजा बांधण्यात आली आहे. ही नयनरम्य पूजा पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कोल्लुर गावी मुकांबिका देवीचे मंदिर आहे. देवी मुकांबिका ही शंख ,चक्र , वरद आणि अभय मुद्रा धारण करून आहे. कोल महर्षींच्या तपामुळे प्रसिद्ध पावलेल्या कोल्लुर क्षेत्र मुका सुराचा वध करणारी म्हणून कोल्लुर मुकांबिका या देवीची आख्यायिका आहे कम्हासुराणे घोर तप सुरू केले. त्यावेळी त्याची वाचा जावी यासाठी सरस्वती ने त्याला मुके केले म्हणून तो मुका सूर झाला. कालांतराने त्याच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून पराशक्तीचा अवतार घेत तिने असुराला मारले आणि तिला मुकांबिका असे नाव मिळाले. देवीसमोर स्वर्ण रेखांकित शिवलिंग आहे. जय शिव आणि शक्तीचे प्रतीक आहे देवी सिंह वाहिनी आहे. आणि तिचे भक्त कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यात आहे अशिया देवीची ख्याती आहे.

मोहटा देवी घटस्थापना

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी माहुरचे दुसरे स्थान म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा हे स्थान प्रसिद्ध आहे. या देवीची घटस्थापना आज मोहटा देवी गडावर करण्यात आली. विशेष म्हणजे संपूर्ण गावातून या देवीच्या मुखवट्याची मिरवणूक काढून त्यानंतर देवीची घटस्थापना करण्यात येते. सुमारे 200 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या देविचे राज्यातून आलेले लाखो भाविक दर्शन घेतात.

जीवदानी देवी

मुंबईच्या जवळ असणारी जीवदानी देवी उंच डोंगरावर वसलेली असून, या देवीच्या दर्शनाला 1200 पायऱ्या चढून वर जावं लागतं. पांडवकालीन ही देवी असून, नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. नवसाला पावणारी ही देवी तसेच भक्ताची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी अशी या देवीची अख्यायिका आहे.

हिरव्यागार डोंगरावर जीवदानी देवीचं पांढरंशुभ्र मंदिर आहे. विरारची जीवदानी देवी  म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकापासून सात ते आठ किलोमीटरवर हे मंदिर आहे. देवीची उभ्या स्वरुपातील मूर्ती संपूर्णपणे संगमरवरी असून, देवीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आलेलं आहे.  देवीला दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. नवरात्रीत इथे सात ते आठ लाख भाविक दर्शनसाठी येतात. भक्तांच्या सुरक्षितते साठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो.  प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

तुळजापूर

तुळजापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रीत होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनानं फक्त दीड तास मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला सहा हजार भाविकांना दर्शन मिळेल अशी व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलीय. याशिवाय प्रवेश पास देण्यासाठी 25 नवीन काऊंटर उघडण्यात आलेत.

पंढरपूर

पंढरपूरच्या मंदिराला सुंदर फुलांची सजावट करण्यात आलीय. विठुरायाचा गाभारा तुळशींनी सजवण्यात आलाय. तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला सुगंधी फुलांची आरास करण्यात आलीय. फुलांचा सुगंध, तुळशीच्या पानांनी मंदिर परिसर सुवासाने दरवळून निघालंय. पुण्यातले भाविक राम जांभूळकर यानी ही फुलांची सेवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विठोबाला अर्पण केलीय.

मुंबादेवी

दीडशे वर्ष जुन्या असलेल्या मुंबादेवीच्या मंदिरालाही खास सजावट करण्यात आलीय. घटस्थापनेचा, नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविकांनी रात्रीपासून देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. नवरात्रीत मुंबादेवीच्या मंदिरात दिवसातून सहावेळा आरती केली जाते.