औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढलेत, की ते आता वेडे झालेत, असे अजब विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

रावते नेमकं काय म्हणाले?

एसटी महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत, पगाराचे प्रश्न आहेत, कामाचे प्रश्न आहेत, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते उत्तर देताना अगदी अहंकारी भाषेत म्हणाले, “कुणी सांगितलं, कुठल्या सालात जगता आपण? कुठल्या सालात जगता आपण एवढंच विचारलं मी तुम्हाला. कारण कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत, आणि ते एवढे वाढलेत की तेच आता वेडे झालेत. आणि हे मी अधिकृत बोलतोय.”

औरंगाबाद शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दरम्यान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत येत्या डिसेंबरपासून औरंगाबाद शहरात 100 बस धावणार आहेत. हा करार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचा तोटा भरुन काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूक करणार असल्याचं म्हटले आहेत.

VIDEO : दिवाकर रावते नेमकं काय म्हणाले?



दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री

दरम्यान, दुसरीकडे दिवाळी सणादरम्यान एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटीच्या भाड्यात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून 20 नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. महसूल वाढीच्या उद्देशानं ही भाडेवाढ दरवर्षी लागू करण्यात येते. तसे अधिकारच राज्य परिवहन प्राधिकरणानं व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. त्याप्रमाणं दरवर्षी 10, 15, 20 टक्क्यांनी सेवानिहाय भाडेवाढ लागू करण्यात येतेय, यंदा मात्र सर्व सेवांसाठी 10 टक्के अशी एकसमान भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.