नवी मुंबई : केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई शहराचा ‘टॉप 10’मध्ये नंबर लागला हे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील स्वच्छता, घणकचरा विल्हेवाट, सार्वजनिक टॉयलेट, रस्त्यांचं सुशोभिकरण यांसारख्या गोष्टींकडे महापालिकेने विशेष लक्ष दिले होते. नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी उत्तम सहभाग घेतला, त्यामुळे हे साध्य झाल्याचे प्रशासनाचे मत आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत आभियानात नवी मुंबई शहराचा नंबर लागला आहे. देशातील स्वच्छ शहरातील यादीत नवी मुंबई मनपाने नंबर मिळवल्याने मानाचा तुरा पालिकेच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.

2016-17 चा स्वच्छ भारत पुरस्कार हा उद्या 4 मे रोजी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पालिका आयुक्त एन रामास्वामी आणि महापौर सुधाकर सोनवणे हा पुरस्कार घेण्यासाठी दिल्ली येथे जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षात महापालिकेने राबविलेल्या विविध योजनांमुळे हा पुरस्कार पालिकेच्या झोळीत आला आहे. यामध्ये संपुर्ण शहरात टॉयलेट उभारणे, शहरातील घणकचऱ्याचे योग्य ते नियोजन, भिंतींना पेटिंग करणे, रस्त्यालगतच्या उद्यानांचे सुशोभिकरण करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहर हागणदारी मुक्त बनवण्यासाठी 1950 व्ययक्तिक, 666 कम्युनिटी आणि 80 सार्वजनिक टॉयलेटची उभारणी पालिकेने केली आहे. शहरातून जाणारे सायन-पनवेल हायवे, पाम बीच रोड, ठाणे- बेलापूर हायवेवर ई-टॉयलेटची उभारणी करून वाहतूकदारांची सोय केली.

शहरात दररोज 750 मेट्रिक टन घणकचरा गोळा होते. यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र होत असल्याने त्याचे वर्गीकरण करणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटींना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे फर्मान पालिकेने सोडले होते. ज्या सोसायट्या हा नियम पाळत नव्हत्या त्यांचा कचरा उचलने बंद केल्यानंतर रहिवाशांना ओला-सुका कचरा वेगळा करण्यास सुरवात केली. यातून 150 मेट्रिक टन ओला कचरा वेगळा झाल्याने त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात आली. तर सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून त्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे.

शहर स्वच्छ दिसतानाच आकर्षक होण्यासाठी पालिकेने महत्वाचे चौक, रस्ते, उद्यानांच्या भिंती रंगवल्या. या भिंतीवर प्राण्यांची, पक्षांची आकर्षक चित्रे काढली. तर काही ठिकाणी समाज प्रबोधनात्मक वाक्य प्रचार, संदेश लिहून जनजागृती केली. रस्त्यांच्या दुजाभकावर उद्याने उभा करून, झाडे लावून सुशोभिकरन करण्यात आले आहे.