नवी दिल्ली : नागपूरमधील चार वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या वसंत दुपारेची फाशी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. 55 वर्षीय वसंत दुपारेची फाशीसंदर्भातील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.


सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 2014 साली वसंत दुपारेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने आजही कायम ठेवला आहे.

2014 मध्ये कोर्टाने म्हटलं होतं की, “माणुसकीला शरमेनं मान खाली घालायला लावणारा हा गुन्हा समाजाला कलंक आहे. हा गुन्हा निश्चितच रेअरेस्ट ऑफर रेअर श्रेणीतला आहे. यामध्ये फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली जाऊच शकत नाही.”

प्रकरण काय आहे?

2008 साली नागपूरमधील वंसत दुपारे याने शेजारी राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवून सोबत नेलं आणि अमानूष बलात्कार केला. यानंतर दगडांनी ठेचून चिमुरडीची त्याने हत्या केली.

याच प्रकरणात वसंत दुपारेला कनिष्ठ न्यायालय आणि मुंबई हायकोर्टानेही फाशीचीच शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने वसंत दुपारेची याचिका फेटाळली आणि म्हटलं आहे की, “दोषी वसंत दुपारे हा चिमुरडीचा शेजारी होता. त्यामुळे चिमुरडीने त्याच्यावर विश्वास ठेवणं सहाजिक होतं. वसंत दुपारेने या विश्वासाचीही हत्या केली. स्वत:ची मदत करु न शकणाऱ्या चिमुरडीसोबत वसंत दुपारेने विकृत कृत्य केले.”

दोषी वसंत दुपारे हा कोणत्याही मानसिक ताणाखाली किंवा कोणत्याही भावनिक समस्येत नव्हता, त्यामुळे तो असं पुन्हा करणार नाही, असे म्हणू शकत नाही, असेही यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले.

वसंत दुपारेच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, वसंत दुपारेचं वय आता 55 वर्षे आहे. त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिल्यास, तो 75 व्या वर्षी सुटेल आणि त्यावेळी समाजासाठी तो घातक ठरणार नाही. मात्र, सुप्रीम कोर्टाने वसंत दुपारेच्या वकिलांचा हा युक्तीवादही फेटाळला.