मुंबई : सध्या राज्यात महाराष्ट्र पोलिसांसमोर (Maharashtra Police) सध्या या गुन्हेगारीला रोखण्याचं मोठ्ठं आव्हान असणार आहे. कारण आज राज्यात ज्या तीन घटना घडल्यात या घटनेवरुन कायद्याचा धाक कुणाला राहिलाय की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काही अज्ञातांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर नवी मुंबईत चड्डी बनियन गँगची दहशत पहायला मिळतेय. तर तिकडे डोंबिवलीमध्ये हातात तलवार घेऊन काहींनी दहशत परवलीये. त्यामुळे या टवाळखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येतेय.
पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाचवेळी अनेक घरात चोरांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले होते. अशातच खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळीने पेठ गावात अनेक घरात चो-या केल्या आहेत. तसेच पायात चप्पल न घालता, अंगावर शर्ट न घालता बनियानवर चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत. पनवेल मध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढूनही पोलीसांना चड्डी बनियान टोळीला अटक करण्यात यश आलेले नाही.
डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय
डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय झाली आहे. डोंबिवलीतील आजदेपाडा परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भराडी माता इमारतीच्या आवारात काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता रहिवाशांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरट्यांच्या हातामध्ये तलवारी दिसून येत आहेत. त्यामुळे डोंबिवली आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस
पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस सुरूच आहे. मध्यरात्री कोयता गँगचा टवाळखोरांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. तापकीर चौकाजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. त्या आधारे वाकड पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे. याआधी सुद्धा कोयता गॅंगने अनेकदा वाहनांची तोडफोड केलीये.
हे ही वाचा :
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण