Nationalist Congress Party : आज राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचा 25 वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज दुपारी 12 वाजता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.


वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना पक्षाच्या वतीने शुक्रवारी नगरमध्ये मोठा मेळावा आयोजित केला होता. पण वेधशाळेने वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने ही सभा लांबणीवर टाकण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 


80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण हे सुत्र : सुप्रिया सुळे


जवळपास पाव शतकाचा हा प्रवास आपल्या सर्वांच्या साथीने अतिशय संस्मरणीय झाला असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करायला सुरुवात केली. स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसने स्व चव्हाण साहेबांनी घालून दिलेले 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण हे सुत्र स्वीकारुन काम केल्याचे सुळे म्हणाल्या.


नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेच्या योगदानाची आम्हाला जाणीव


जनहिताच्या भूमिकांपासून कधीही फारकत घेतली नाही उलट त्याचा जोरदारपणे पुरस्कारच केला आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फुले-शाहू-आंबेडकर आदी थोर व्यक्तीमत्वांच्या विचारांचा जागर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सदैव अग्रेसर राहिली असल्याचे सुळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या दिवंगत सहकाऱ्यांची कृतज्ञ आठवण करणे गरजेचे आहे. त्यांच्या योगदानास आम्ही सर्वजण सलाम करतो. यासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा जागर करणारे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता या प्रत्येकाच्या योगदानाची आम्हाला जाणीव आहे. त्या सर्वांचे सुप्रिया सुळे यांनी कृतज्ञतापुर्वक आभार मानले. 


जनतेने देखील कितीही कठिण प्रसंग आले तरीही आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहण्याची भूमिका घेतली. यामुळेच आज आपण येथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. जनतेच्या या उदंड पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वजण जनतेप्रती कृतज्ञ असल्याचे सुळे यांनी म्हटलं आहे.