Maharashtra Weather : सध्या राज्यात तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. नागरिकांना दुपारी उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळं सध्या नागरिक पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भ (Vidarbha) आणि कोकणात (Konkan) नकळत उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती आहे. १५ जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर कदाचित वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो. कारण १६ जूनच्या आसपास मान्सून कदाचित गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.


Temperature : दुपारच्या कमाल तापमानात मोठी वाढ


सूर्यकिरणांच्या जमिनीवर ओतल्या जाणाऱ्या सध्याच्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय त्या किरणांना अडथळा करणाऱ्या ढगांचा अभाव यामुळं अधिक उष्णता म्हणून अति आर्द्रतेत कमालीची वाढ झाली आहे. यातून सध्या असह्य अशी जीवाची घालमेल जाणवत आहे. दरम्यान सध्या जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे भागात बिपोरजॉय वादळातील अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी २५ ते ३० किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल, असे खुळे यांनी सांगितले आहे.


मान्सून सात दिवस उशीरा केरळमध्ये दाखल


एक जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून चार दिवस उशिराने म्हणजे चार जूनला येणं अपेक्षित होतं. त्यातही कमी अधिक चार दिवसाचा फरक जमेस धरून तो केरळात एक जून ते आठ जून या आठ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून यावर्षी  आगमनासंबंधी वर्तवले गेले होते. त्याप्रमाणं मान्सून गुरुवार दिनांक ८ जुनला  केरळमध्ये दाखल झाला आहे. हा दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पुर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर आणि तामिळनाडूतील कोडाईकनल तसेच आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.


बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव 


बिपरजॉयचा प्रभाव येत्या ३६ तासांत देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार  बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल.    


महत्त्वाच्या बातम्या:


El Nino : एल निनोचं आगमन, अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर; नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता