इमारतीची वीट ते फर्निचर चोरीच्या पैशातून, नाशिकचा सोनसाखळी चोर
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 15 May 2017 05:17 PM (IST)
नाशिक : नाशिकच्या पेठ रस्त्यावर दिमाखात उभी राहिलेली इमारत एका अट्टल सोनसाखळी चोराची आहे. घराच्या वीटेपासून फर्निचरपर्यंत लागलेला एक न एक पैसा चोरीचा आहे. किरण सोनावणेचा फिल्मीस्टाईल प्रवास बघून पोलिसही भांबावले आहेत. परवापर्यंत या चोरट्याचं सर्वकाही सुरळीत होतं. मात्र चोरीवेळी घडलेल्या अपघातानं किरणचं बिंग फुटलं. तीन दिवसांपूर्वी 55 वर्षीय महिला पायी घरी जात होती. त्याचवेळी किरण सोनवणे आणि त्याच्या साथीदारानं पल्सर गाडीवरुन महिलेच्या गळ्यातली 95 हजारांची चेन खेचली. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांचा पाठलाग केला. त्याच नादात गाडीला अपघात झाल्यानं दोघंही गाडी सोडून पसार झाले. पल्सर गाडीच्या नंबरवरुन तपासाची सूत्रं फिरली. गाडी ज्याच्या नावावर होती तो दुचाकीच्या शोरुमधला कर्मचारी निघाला. हाच कर्मचारी नव्या कोऱ्या गाड्या काही तासांसाठी किरण सोनवणेला भाड्यानं द्यायचा. सध्या नाशकात याच लखपती चोराची चर्चा आहे. मात्र सोनसाखळी पळवणारा लखपती होतो, टोलेजंग इमारती बांधतो, तोपर्यंत पोलीस नावाची संस्था कुठे असते? हा प्रश्न आहे.