अकोला : जलयुक्त शिवार योजनेमध्ये जर घोटाळे होत असतील, तर या योजनेत आणि सिंचन घोटाळ्यामध्ये फरक काय राहिला? असा प्रश्न उपस्थित करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या वक्तव्याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. 'वाल्याच्या वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये आहे, असं भाजप नेते म्हणतात. मात्र ज्या पद्धतीने भाजप नेते वक्तव्य करत आहेत, ते पाहता वाल्मिकीचा वाल्या होत आहे की काय अशी शंका येत आहे' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

सत्तेत असू किंवा विरोधात, नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे


विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

शेतकऱ्याच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, तो शेतकरी बोललाय का?  पण आता त्या शेतकऱ्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं.

या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील एकूण परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेणार आहेत. या अभियानाचा शेवट 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.