Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : गरज वाटली तर मी छगन भुजबळ यांची भेट घेईल. मला जर वाटलं त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, तर मी भेट घेईल. पण भुजबळांचा सल्ला घ्यावा असं अजूनतरी मला वाटत नाही असा टोला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला. पक्षाने मला आदेश दिला आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. खाली आपण कोणताही भाष्य करु नये. त्यामुळं मी त्या संदर्भात काही स्टेटमेंट करु इच्छित नाही असेही ते म्हणाले.
भुजबळ साहेबांना माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण कलगीतुरा नको. पार्टीकडून मला आदेश आले आहे की, भाष्य करू नये, त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, असेही त्यांनी काल म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे? असा सवाल उपस्थित करत राज्याचे माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते.
नाशिक जिल्हा बँक अडचणीत
नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे. ठेवीदारांना अनेक अडचणी आहेत. मात्र, शेतकरी ज्यांचं कर्ज आहे ते भरत नाहीत. शासनाकडून कारवाई सुरु आहे, ती कारवाई थांबवण्यासंदर्भात या ठिकाणी मला शेतकरी भेटल्याचे कोकाटे म्हणाले. कारवाई थांबवणे अवघड आहे, मात्र कायदेशीर मार्ग काढू असे ते म्हणाले. सहकार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करु असंही कोकाटे म्हणाले.
कर्जमाफीच्या संदर्भातील विषय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हाताळतायेत
जर त्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलं असेल तर संचालक मंडळावर कारवाई केलीच पाहिजे असेही कोकाटे म्हणाले. मी स्वतः असेल तरी माझ्यावर कारवाई झाली पाहिजे असे कोकाटे म्हणाले. कर्जमाफीच्या संदर्भातील विषय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हाताळत आहेत. ते त्याप्रमाणे निर्णय देखील घेऊ शकतात. मी त्यावर खुलासा करू शकत नाही ते माझं खातं नाही. शेतकरी कर्जमाफीमध्ये दोन गट आहेत, एक सातत्याने कर्ज भरणारे मग आमच्यावर अन्याय का? आणि जे थकबाकीदार आहेत ते म्हणतात आत्महत्येची वेळ आली, कर्ज माफ करा असे दोन मत प्रभाह आहे. याच्यावर विचारपूर्वक निर्णय सरकार घेईल असे कोकाटे म्हणाले.