Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गन कल्चर समोर आणताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तसेच सुरेश धस यांनी सुद्धा गंभीर आरोप करत मग बीड जिल्ह्यात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्यांचा फोटो आणि व्हिडिओ समोर आणले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा फास आवळण्यात आला होता. दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये 100 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड असल्याचा आरोप होत असलेला कुख्यात खंडणीखोर वाल्मीक कराडचा सुद्धा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.


वाल्मीक कराडवर एकूण 14 गुन्हे


गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही बीड जिल्ह्यातील अनेक जणांकडे पिस्तूल परवाने होते.  यापैकी 300 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडचा पिस्तूल परवाना आता रद्द करण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर एकूण 14 गुन्हे होते त्या गुन्ह्यापैकी दहा गुन्हे निकाली निघाले असले तरी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. वाल्मीक कराडने 1996 मध्ये पिस्तूल परवाना मिळवला होता. तो आता रद्द करण्यात आला आहे. 


पवनचक्की खंडणी प्रकरणातील आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. मात्र, यामधून वाल्मीक कराडचा समावेश करण्यात आलेला नाही. वाल्मीक कराडवर अजूनही खंडणी प्रकरणातील आरोप सिद्ध झाला नसल्याने त्याच्यावर कारवाई सध्याला टळली गेल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर आता काही तासांमध्येच वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील विशेष करून परळी तालुक्यातील सर्वाधिक परवाने देण्यात आल्याने त्यांची पार्श्वभूमी तपासली नव्हती का याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सातत्याने व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आणले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या