Nitin Raut : राज्यात गेल्या 22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही. यापुढेही पुढेही लोडशेडिंग होणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोळसा टंचामुळे लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. परंतु, यापुढे  कोळशाची कमतरता भासणार नाही आणि महानिर्मितीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे  गेल्या 22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही आणि पुढेही होणार नाही, अशी माहिती नितीन राऊत यानी दिली आहे. 


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी गावात विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी नितीन राऊत बोलत होते. 
 
"शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे प्लॅन केले आहेत. केंद्राने कोळशाचे नियोजन व्यवस्थित केले नाही. मालगाड्या सुरू केल्या तरी व्यवस्थित पुरवठा होत नाही. देशातील इतर 12-13 राज्यात लोडशेडिंग आहे. परंतु, महाराष्ट्रात आता लोडशेडिंग नाही ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले.  


दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक मंत्रालयाची लाईट गेली होती. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, मुंबई किंवा मंत्रालय या ठिकाणी महावितरण काम करत नाही. तेथे टाटा, बेस्ट आणि अदानी या कंपन्या काम करतात. मंत्रालयाचा परिसर बेस्टमध्ये येते. आमच्या नियंत्रणाखाली तो भाग येत नसल्यामुळे आम्ही त्याची चौकशी करू शकत नाही."
 
 केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल 'समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या' असं आवाहन बंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना केलं होत. यावरही मंत्री राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. "आठवलेंनी अनेक वेळा अशी आवाहने केली आहेत. आठवलेंच्या नेतृत्वावर किती विश्वास ठेवावा. अनुसूचित जातीसाठी जो निधी हवा तो केंद्राच्या बजेटमध्ये कमी आहे. समाजाबाबत त्यांना किती आपुलकी आहे हे दिसत आहे. संविधानाची लक्तरे निघत असताना ते गप्प का? असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला.