Nashik Rain Update : गेल्या महिनाभरात नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्याच सुमारास नाशिक तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात (Crop Damage) नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून अयोध्या दौरा (Ayodhya Tour) झाला असेल तर सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थिती पाहावी अशी मागणी करत शेतकरी संतप्त झाले आहेत. 


नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) रविवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) वंजारवाडी परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. अनेक ठिकाणी काकडी ही गळून पडली आहे. अनेक शेतामध्ये पूर्णतः पाणी, चिखल हा नजरेस पडत आहे. तालुक्यातील वंजारवाडी, पांढुर्ली, लोहशिंगवे या सर्वच गावामध्ये नुकसानग्रस्त परिस्थिती पाहायला मिळते आहे. त्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जवळपास एक महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा हा बसलेला असून बळीराजा हा संकटात सापडला आहे.


सायंकाळी सहा साडेसहा वाजता सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकासह इतर रब्बी पिकांना झोडपून काढले. अवघ्या पाहून तासाच्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. यात गारपीट अधिक झाल्याने पिकांना फटका बसला आहे. कालच्या गारपिटीमुळे जवळपास 80 टक्के टोमॅटो हा जमिनीवर गळून पडल्याचे शेतकरी म्हणाले. कर्ज काढून पीक उभं केलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे सगळ हिरावून घेतला आहे. जवळपास 80 टक्के टोमॅटो झाडावरून जमिनीवर गळून पडला आहे. अद्यापही अनेक दुकानदारांची बिल आमच्याकडे बाकी आहेत, मात्र अशा पद्धतीने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे बिल कशी भरायची आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे.


अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने जरी 50 हजार रुपये अनुदान दिलं तरी शेतकऱ्यांना परवडणारे नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पडणारा अवकाळी पावसामुळे शेतकरी प्रचंड मेहनत घेऊन पिकाला वाढवत होता. मात्र सलग तिसऱ्या अवकाळी पावसामुळे सोन्यासारख्या पिकाचा चिखल झाल्याचे शेतकरी शिंदे यांनी सांगितले. आमच्या वस्तीत अनेक शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून औषधे बियाणे घेऊन शेती केली. याचे जवळपास एक-एक, दीड लाख रुपये बिल झालं असताना आता अशातच अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे हे बिल कुठून भरायचे हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, अवकाळी पावसामुळे कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, फ्लॉवर, काकडी, कोबी, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. साकोरे लोहशिंगवे, शेणीत आदि परिसरातही नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना लाख लाख रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार केवळ दोन दोन तीन हजार रुपये देऊन शेतकऱ्याला शेतकऱ्याची बोळवण करत आहे. या दोन तीन हजारात कसं जगायचं? एवढी नुकसान होऊनही शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नसेल तर शेतकऱ्यान करायचं काय? असा सवाल  शेतकऱ्यांनी उपस्थित केला.


सरकार देवधर्म करण्यात व्यस्त...


सध्याचे सरकार देवधर्म करत आहे? कोण कुठे जातंय? इकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. काल झालेल्या पावसामुळे शेतकरी रात्रभर झोपला नाही. सकाळी उठून पुन्हा शेतात आलो आहे. कोण पाणी काढतंय? कोण पिकं पाहतंय? आता मागच्या पावसात आमच्या चुलत भावाच घर पडलं होतं, त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, अशी खंत तरुण शेतकऱ्याने बोलून दाखवली. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. मात्र अशा पद्धतीने महिन्यातून तीन तीन वेळा अवकाळी पाऊस बरसतो आहे. तर शेतकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ येईल? मग तो जगाचा पोशिंदा कसा राहील? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.