Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या एका जयंतीच्या कार्यक्रमात नेत्यांचं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचा रविवारी उद्घाटन कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनीही उपस्थिती लावली होती. याच कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अध्यक्षीय भाषणासाठी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) उभे राहिले. त्यांनी भाषण सुरू केलं आणि ते एकापाठोपाठ योजनांची माहिती देऊ लागले. पण तेवढ्यात ठाकरे गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कराडांचं भाषण रोखलं आणि हा जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही, असं कराडांना सांगितलं. 


छत्रपती संभाजीनगरच्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचं रविवारी उद्घाटन होतं. यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. कार्यक्रमची वेळ सहा वाजल्याची असल्यानं माजी खासदार चंद्रकांत खैरे तिथे आले. मात्र कार्यक्रम सुरू होण्यास अवकाश असल्यानं त्यांनी  इतर कार्यक्रम करून येतो, म्हणून तिथून काढता पाया घेतला. त्या पाठोपाठ खासदार इम्तियाज जालिल आले त्यांनीदेखील वेळ असल्यानं आयोजकांची भेट घेऊन रोजा असल्याचं सांगत तिथून निघून गेले. केंद्रीय राज्य अर्थमंत्री कराड, मंत्री सावे आल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. समितीतील सदस्यांची भाषणं झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचं भाषण झालं आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी  केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांचं भाषण सुरू झालं.


कार्यक्रमात नेमकं घडलं काय? 


केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं भाषण सुरू असतानाच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं आगमन कार्यक्रमस्थळी झालं. खैरे यांचं आगमन होताच डॉ. कराड यांनी भाषण थांबवलं. खैरे जवळ येताच केंद्रीय मंत्री कराड यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र खैरे यांनी कराडांकडे दुर्लक्ष करत महाविकास आघाडीत सोबत असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसले. 


मंत्री कराड यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.  केंद्रातील मोदी सरकार कशा पद्धतीनं योजनांमार्फत गरिबांना मदत करत आहे. हे सांगत असताना राष्ट्रवादीचे आमदार चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री कराड यांच्या चालू भाषणात खोडा घालत हा जयंतीचा कार्यक्रम आहे. इथे काही प्रचार सुरु नाही, असं कराड यांना खडसावलं. या नंतरही कराडा यांनी केंद्र सरकार कशा पद्धतीनं गरजू वंचिताना मदत करतं, याबाबत माहिती देणं सुरूच ठेवलं आणि आमदार सतीश चव्हाण यांच्या बाजूला बसलेले खैरे यांना उद्देशून गरिबांच्या योजना सांगितल्या. त्यावेळी टाळ्या सुरु झाल्या खैरे हे देखील टाळ्या वाजवत असतानाच बाजूला बसलेले आमदार सतीश चव्हाण यांनी खैरेंचा हात पकडून त्यांना टाळ्या वाजवू दिल्या नाहीत. हा सर्व राजकीय नाट्य प्रकार पाहून उपस्थितांच्या देखील भुवया उंचावल्या. 


दरम्यान, कार्यक्रमानंतर केंद्रीय राज्य अर्थमंत्री कराड यांना विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. मात्र चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना डॉक्टरला (मंत्री कराड ) खूष करण्यासाठी टाळ्या वाजविल्या होत्या, असं मिश्किल टिप्पणी केली.