Nashik Crime : सरकारी नोकरीचं (Govt Job) आमिष दाखवून जवळपास 50 बेरोजगार तरुणांना 51 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी संतोष मुळे नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. मुळेने नांदेडमध्ये (Nanded news) पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु केलं होतं. गेल्या 7 वर्षांपासून मुळे हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांना (Nashik Police) मिळाली. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी चंद्रभान मुळेला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


आरोपी मूळचा अहमदनगरचा, 49 जणांना घातला 51 लाखांना गंडा


तब्बल 14 वर्ष फरार झालेला आणि नांदेडला पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत असलेल्या संतोष मुळे या आरोपीने M.SC Electronics चे शिक्षण घेतले आहे. तो MPSC ची देखील तयारी करत होता. पत्नी आणि दोन मुलं असा त्याचा परिवार आहे. मूळचा तो अहमदनगरचा जिल्ह्यातील रहिवासी असून गावी शेतीही करायचा. नाशिकला आल्यानंतर श्रीमंत होण्याची इच्छा असल्याने त्याने फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. नाशिक जिल्ह्यातील 49 जणांना त्याने 51 लाखांना गंडा घातलाय. जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर शासकीय कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष तो दाखवायचा आणि त्याबदल्यात 50 हजार ते 2 लाख रुपये तो घ्यायचा. नांदेडला त्याने सुरू केलेल्या पाटील पोलीस प्रशिक्षण अकादमीत सध्या 100 हून अधिक जण प्रशिक्षण घेत होते अशी चर्चा आहे.


गुन्हा दाखल होण्याआधीच मुळे  फरार


नाशिकच्या पेठरोड परिसरातील क्रांतीनगर मध्ये राहणाऱ्या संतोष मुळे या 55 वर्षीय इसमावर 28  मे 2008 रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगून नाशिक जिल्ह्यातील तब्बल 49 जणांची त्याने 51 लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्याआधीच मुळे हा फरार झाला होता. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी तो नांदेड जिल्ह्यात असल्याची गुप्त माहिती मिळताच पंचवटी पोलिसांचे पथक नांदेडच्या किनवटमध्ये दाखल झाले आणि सोमवारी गोकुंदा गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुळेच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. 


गोकुंदा गावी भरतीपूर्व पोलिस प्रशिक्षण केंद्र


आश्चर्याची गोष्ट म्हणजे संतोष मुळे हा गोकुंदा गावी भरतीपूर्व पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. स्वतःचे नाव बदलून संतोष मुळे पाटील म्हणून तो तिथे वास्तव्यास होता. आजवर अनेकांना त्याने प्रशिक्षण दिले आहे. गेल्या सात वर्षांपासून तो हे केंद्र चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने मुळेला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याने अजून कोणाची आणि कशाप्रकारे फसवणूक केलीय? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का ? याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत. 


विशेष म्हणजे तब्बल 14 वर्ष मुळे हा पोलिसांच्या हाती का लागला नाही ? पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी त्याला परवानगीच कशी देण्यात आली ? अशाप्रकारे राज्यात आणखी किती आरोपी पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवत असतील ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत.