मुंबई :  ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या दिल्ली वारी


मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पाचव्यांदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.  दिल्ली दौऱ्याचं कारण कोर्ट खटले आणि निवडणुक आयोगाचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री आज दिल्लीत असले तरी उपमुख्यमंत्री मात्र महाराष्ट्रातच असणार आहेत.


आजपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा 


आजपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. साधारण 13 ते 19 जुलै दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती.  सकाळी 6 वाजल्यापासून दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर अशी दोन जिल्ह्यात पाहणी करणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा आंधरे आज शिवसेनेत प्रवेश करणार


  कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा आंधरे आज दुपारी 12 वाजता, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 
 
आज दीप म्हणजेच गटारी अमावस्या


आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. . या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे.


 राज्यसभेत निलंबन केलेल्या खासदारांचे आंदोलन


 राज्यसभेत निलंबन केलेल्या 20 खासदारांनी रिले आंदोलन संसद भवनात सुरू केलं आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू केलेलं हे आंदोलन शुक्रवारी दुपारी 1 वाजता संपणार आहे.