Narendra Modi Mumbai–Nagpur Expressway: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Mahamarg) उद्घाटन होणार आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं रविवारी पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन होणार आहे. पण समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. समृद्धी महामार्गावर "जेवढा प्रवास तेवढाच टोल" (Samruddhi Mahamarg toll rates) अशा पद्धतीने टोल आकारणी केली जाणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)फक्त एक्झीट पॉईंटवरच टोल बूथ असणार आहेत.
नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे. या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ आहेत... छोट्या चार चाकी वाहनांसाठी प्रति किमी 1 रुपये 73 पैसे टोल निश्चित करण्यात आला आहे.. म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचे 520 km अंतराकरिता 900 रुपये टोल भरावा लागणार आहे... तर मुंबई पर्यंतच्या 701 किमीच्या प्रवासासाठी साधारण पणे बाराशे रुपयांचा टोल लागणार आहे. हलक्या व्यावसायिक किंवा मालवाहतुकीच्या वाहनांसाठी 2 रूपये 79 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. बस अथवा ट्रक या वाहनांसाठी 5 रूपये 85 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे.. मोठ्या व्यावसायिक वाहनांना 6 रूपये 38 पैसेच्या दराने टोल द्यावा लागणार आहे.
टोल बूथवर महिला कर्मचारी करणार काम -
समृद्धी महामार्गावरच्या टोल बूथचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही टोल बूथवर प्रायोगिक तत्त्वावर दिवसाच्या शिफ्ट मध्ये फक्त महिलाच कार्यरत राहणार आहे... यासाठी आजूबाजूच्या गावातील महिलांना खास प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील वायफळच्या टोल बूथपासून याची सुरुवात होणार आहे. वायफळच्या टोल बूथ वर पहिल्याच दिवसापासून फक्त महिला कर्मचारी दिवसा काम करताना दिसणार आहेत. समृद्धी महामार्गावर नागपूरपासून मुंबईपर्यंत एकूण 26 टोल बूथ असणार आहे.. मात्र सध्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ कार्यरत होणार आहेत. समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टरला प्रवासाची परवानगी मिळणार नाही.
राज्यातला सर्वात मोठा चौक -
समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच तब्बल 18 एकर विस्तार असलेला आणि सुमारे एक किलोमीटरची परिक्रमा असलेला राज्यातला सर्वात मोठा चौक उभारण्यात आला आहे. जेवढा अवाढव्य समृद्धी महामार्ग आहे, तेवढाच प्रशस्त समृद्धीच्या आरंभबिंदूवरचा हा चौक आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी 120 किलोमीटर प्रतितासची वेग मर्यादा आहे.. म्हणजेच अत्यंत तीव्र गतीने समृद्धी महामार्गावर वाहनांचा आवागमन होणार आहे. मात्र समृद्धी महामार्गावरून बाहेर पडताना वाहनांचा वेग हळुवार पद्धतीने कमी होत जावा या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच समृद्धीच्या झिरो माइल्सवर तब्बल एक किलोमीटरची परिक्रमा असलेला चौक उभारण्यात आला आहे.. समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यानंतर नागपूरच्या दिशेने जाणारे वाहन याच चौकाची परिक्रमा करताना हळूहळू वेग कमी करतील आणि मग सुरक्षित दृष्ट्या पुढचा प्रवास करतील असा उद्दिष्ट यामागे आहे... समृद्धीच्या आरंभबिंदू वरचा हा चौक खूप सुंदर ही आहे... तिथे आकर्षक रंगांची फुलझाडं आणि अनेक प्रजातीची मोठी झाडंही लावण्यात आली आहेत. त्याचा आकार अंगणात रांगोळी घालावी असा असून आकाशातून हा चौक समृद्धी महामार्गावरची प्रचंड आकाराची रांगोळी सारखाच दिसतो. समृद्धी महामार्गावरच्या या विशाल चौकात विद्युत रोषणाई करण्यासाठी खास सोलार ट्री लावण्यात आले आहेत. त्यामुळे तिथेच निर्माण होणाऱ्या विजेतून रात्रीच्या वेळेला या चौकाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.