रत्नागिरी : नारायण राणे! राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेलं नाव. एक शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा नारायण राणेंचा प्रवास. सध्या नारायण राणे हे राज्यसभेत खासदार आहेत. आपल्या राजकीय प्रवासात त्यांच्यावर अनेक वेळा टीका झाली. विरोधकांनी टीकेच्या फैरी झाडल्या. त्याला देखील नारायण राणे यांनी त्याच आक्रमकपणे उत्तर दिलं. नारायण राणे यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पाहावा लागला. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करत राणे सध्या भाजपमध्ये दाखल झाले. मधल्या काळात त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पण, भाजप प्रवेशानंतर तो भाजपमध्ये विलिन झाला. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे अधिक आक्रमक होतात. त्याचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नारायण राणे यांनी घेतलेले राजकीय निर्णय, त्यांच्या खेळी आणि निवडणुकांदरम्यान झालेले वाद यामुळे ते कायम चर्चेत राहिले. अद्यापही त्यांच्या राजकीय टीका-टिप्पणी ही कायम आहे. असं असलं तरी नारायण राणे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक जण खासगीत चांगले अनुभव सांगतात. नारायण राणे जरी कमी शिकलेले असलेले तरी त्यांना प्रशासनाची जाण चांगली आहे. मुळात नारायण राणे यांच्या शिक्षणाचा मुद्दा किंवा त्यावर साधकबाधक का असेना चर्चा सुरु होण्याचं कारण म्हणजे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केलेली टीका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. यावेळी त्यांनी आपण नारायण राणे यांच्या पाठिशी उभे असल्याचे संकेत दिले. शिवाय नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा रंगली. 'नारायण राणेंसारख्या नॉनमॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार असेल तर ते सिंधुदुर्गचं दुर्दैव असेल' अशी टीका राऊत यांनी केली. त्यानंतर कोकणात राजकीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या आरोप-प्रत्यारोप आणि परस्पर विरोधातील आंदोलनांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. याचवरुन राजकारण आणि शिक्षण याबाबतच्या मुद्यांवर ठिकठिकाणी चर्चा केल्या जाऊ लागल्या. राणेंच्या राजकीय खेळीबाबत मतमतांतरं, टीकेचा सूर असला तरी त्यांच्या राजकीय प्रवास हा पाहण्यासारखाच आहे.


शिवसैनिक ते मुख्यमंत्री नारायण राणेंचा प्रवास!



नारायण राणे हे आक्रमक आहेत. काही जण त्यांना फटकळ देखील म्हणतात. त्यांच्या या स्वभावाचे अनेक किस्से पत्रकारांच्या तोंडून ऐकायला मिळतात. असं असलं तरी त्यांचा राजकीय प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. नारायण राणेंच्या या राजकीय प्रवासाबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही काही मुंबईतील अनुभवी, राणेंना जवळून पाहिलेल्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय परब यांनी 'कोकणात नारायण राणेंचं मूळ गाव. त्यांचे वडील हे गिरणी कामगार असल्याने ते मुंबईतील चेंबूर येथे स्थिरावले. या भागात राहत असताना वेंगुर्ल्यातील हरिश्चंद्र परब आणि नारायण राणे यांची जोडी खूप फेसम होती. (कोकणात कुणाही जिगरबाज दोस्तांना आजही हऱ्या-नाऱ्याची जोडी असं गमतीने म्हणतात) चेंबुरमधील या परिसरात त्याचंच राज होतं असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये. एकंदरीत यावरुन त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकते. नारायण राणे हे तसे आक्रमक आणि बिनधास्त होते. या काळात शिवसेना उभी राहत होती आणि त्याच वेळी नारायण राणेंचा तो आक्रमकपणा, बिधनास्तपणा बाळासाहेबांच्या नजरेत आला. नारायण राणे एक सामान्य शिवसैनिक होते. त्यानंतर ते शाखाप्रमुख झाले. नव्वदच्या दशकात ते नगरसेवक म्हणून निवडून आले. एक शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक, मुंबईच्या बेस्ट समितीचे चेअरमन, आमदार, विरोधीपक्ष नेते, मुख्यमंत्री अशा चढत्या क्रमानं त्यांनी राजकीय कारकीर्द वाढत गेली. त्यांच्या निर्णयांवर किंवा त्यांच्या राजकीय खेळींमुळे त्यांच्यावर टीका झाली, होतेय आणि होत राहणार यात काहीही दुमत नाही. पण, असं असलं तरी त्यांनी मिळालेला संधीचं त्यांनी सोनं केलं. आपल्या कामाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली. बेस्ट समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी मांडलेला बेस्टचा अर्थसंकल्प आणि त्यानंतर बेस्टची कामगिरी ही बाब सर्वांना माहित आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी बेस्टमध्ये मराठी माणसाला जास्त संधी कशी मिळेल? कोकणातील तरुणांना रोजगार कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांचं वाचन प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक बाबतीची माहिती असते. विधीमंडळात प्रश्न मांडताना ते अभ्यासू आणि परिपूर्ण रितीने मांडतात. युतीचं सरकार असताना त्यांच्यावरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येण्यापूर्वी महसूल खातं होतं. याचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी प्रत्येक मुद्दा, विषय समजून घेतला. खातं किंवा विभाग कोणतंही असो त्यासंबंधी प्रत्येक माहिती त्यांच्यापाशी असते. प्रत्येक गोष्ट जाणून घेत असल्याने त्यांनी चुकीची माहिती कधी कोणत्या अधिकाऱ्याने दिली नाही. त्यामुळेच त्यांची प्रशासनावर पकड राहिली. ज्याप्रमाणे घोडेस्वाराची घोड्यावर मांड असायला हवी तशी ती नारायण राणे यांची प्रशासनावर ठेवली होती. शिक्षण कमी असलं तरी काही माणसांमध्ये आपल्याला काही तरी मिळवत राहिलं पाहिजे अशी वृत्ती असते ती नारायण राणेंमध्ये होती किंवा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या केवळ 11 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दित धडाकेबाज निर्णय घेतले. तसं पाहिलं तर राणेंना मुख्यमंत्रीपदाचा काळ हा कमीच मिळाला. तो त्यांना जास्त मिळाला तर कदाचित राज्यातील चित्र वेगळं दिसलं असतं. महसूलमंत्री किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून विषयाची जाण चांगल्या प्रकारे करुन घेतली होती. किंवा काही अधिकारी हे त्यांच्याकडे रुजू झाले होते. या सगळ्याचं फलित म्हणून त्यांचा मुख्यमंत्री म्हणून असलेला कालावधी चांगलाच चर्चेत राहिला. त्यांनी घेतलेले निर्णय हे धडाकेबाज, लोकहिताचे असे होते. शिवाय, कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी नारायण राणे यांचं योगदान नाकारता येणार नाही. समाजवादी पक्षाची जागा भरुन काढण्यास राणेंची त्याकाळातील कामगिरी ही महत्त्वाची होती. त्यांच्या राजकीय खेळी याबद्दल काहीही मत असो, अशा माहिती 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


राणेंचं शिक्षण कमी अभ्यास मात्र उत्तम


दरम्यान, राजकारणात शिक्षण किती महत्त्वाचं? असा प्रश्न आम्ही किरण देशमुख यांना करत त्यांना नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर बोलताना किरण देशमुख यांनी आपण जर राणेंच्या राजकारणाचा काळ आणि सद्यस्थिती असं पाहिलं पाहिजे. त्याकाळात राजकारणात पोत वेगळा होता. त्यावेळी शिक्षण किती आहे हे कोण पाहत नव्हतं. पण, आता त्यामध्ये बदल झाला आहे. त्याला अनेक कारणं असतील. या राज्याने अनेक कमी शिकलेले मुख्यमंत्री पाहिले आहेत. वसंतदादांचं शिक्षण किती होतं? पण, त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री चांगलं काम केलंच ना? सद्यस्थितीत शिक्षणाला महत्त्व आहे ही बाब नाकारुन चालणार नाही. पण, नारायण राणेंचं शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांचा अभ्यास मात्र उत्तम होता. प्रत्येक विषयाची त्यांना जाण होती. प्रशासकीय अधिकारी त्यांना माहिती देताना योग्य ती देत. त्यामध्ये राणेंना वावगं वाटल्यास ते त्यामध्ये बदल करत. अधिकाऱ्यांशी, प्रशासनाशी सुसंवाद ठेवत त्यांनी प्रत्येक विषयाची माहिती करुन घेतली होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक विषयाची जाण होती. म्हणूनच नारायण राणे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धडाकेबाज निर्णय घेतले. एखाद्या विषयाची माहिती पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते बोलत नसतं. प्रशासनामध्ये अनेक अडचणी येतात. आपल्याला कायद्याचं देखील पाहावं लागतं. अशा वेळी काही निर्णय थांबतात. पण, राणे यांच्याबाबतीत मात्र ते कधी झालं झाली. साऱ्या गोष्टींचा अभ्यास करत किंवा त्यांना त्या विषयाची जाण, माहिती असल्याने त्यांनी योग्य ते निर्णय घेतले. किंवा त्यांना निर्णय घेताना कधी अडचण आली नाही आणि निर्णय कधी अडले नाहीत. एकंदरीत नारायण राणेंची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पाहिली तर त्यांची प्रशासनावर पकड ही उत्तम होती. राज्यात असे काही नेते आहेत ज्यांना प्रशासन चांगलं ठावूक आहे. त्यामुळे राज्यकारभार हाकताना त्यांना अडचण येत नाही. त्यामध्ये नारायण राणे यांचा निश्चित समावेश होतो. अभ्यासपूर्ण आणि लोकप्रिय निर्णय घेणारे नेते लोकांना आवडतात हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवाय, आम्ही सकृत खांडेकर यांच्याशी देखील याबाबत संवाद साधला. खांडेकर मागील एक ते दीड महिन्यापासून 'प्रहार'मध्ये संपादक म्हणून काम करतात. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या कारकीर्दीबाबत विचारले असता त्यांनी 'नारायण राणेंची प्रशासनावर उत्तम पकड होती. हे सर्वांना माहित आहे. म्हणून त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ही त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे चर्चेत राहिली. यावेळी आपण आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. नारायण राणे ज्यावेळी विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पावर भाषण करत त्यावेळी सभागृह भरलेलं असे. सत्ताधारी-विरोधीपक्षाचे आमदार, प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी ही सारी भरलेली असे, असं त्याचं भाषण हे अभ्यापूर्ण असे. त्याच्या नोंदी देखील आपल्याला सहज मिळून जातील. नारायण राणे यांनी पक्षाच्या बाहेर देखील मैत्री जपली. राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी याचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतील. आज ते भाजपमध्ये असले तरी त्यांचे सर्वच पक्षांमध्ये मित्र आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना देखील त्यांनी कायम महत्त्व दिलं आहे.


Shivsena vs Rane | कोकणात शिवसेना-राणे वादानंतर काय असेल राजकीय परिस्थिती? WEB EXPLAINER