Nandurbar Police : सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उभे असलेले पोलिस बांधव बऱ्याचदा कडक भूमिका घेतात. काही वेळी पोलिसांबद्दलच काहींच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलिसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे. श्रेयस दिलीप नांदेडकर या तरुणाला मोठी मदत नंदुरबार पोलिसांनी केली आहे. श्रेयसचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग. उभा राहता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यानेच उचलून न्यावे लागते. बोलताना अडखळत बोलतो. घरची परिस्थिती अत्यंत गरीब.


नंदुरबार पोलिसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर झेरॅाक्स मशीनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. श्रेयसच्या एका हाताची थोडीशी हालचाल होते, परिस्थितीला शरण न जाता याच एका हाताने तो वडिलांना झेरॅाक्स काढायला मदत करायचा.


अचानक 14 एप्रिलला श्रेयसचे वडील हार्ट ॲटॅकने वारले आणि दिव्यांग श्रेयसच्या कुटुंबावर नियतीने दुसरा निर्दयी आघात केला. स्वतःलाच उभे राहता येत नाही. तिथं आईचा सांभाळ कसा करायचा या विचाराने तो सैरभैर झाला. आतापर्यंत वडील त्याला दुकानापर्यंत पाठीवर उचलून आणायचे, आता पुढे काय? जीवनाची लढाई लढायची तर आहेच पण कसे? दिलीप नांदेडकरांचा संसार त्यांच्या पश्चात उघड्यावर पडला.


ही माहिती कळताच नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी श्रेयसला बालावून घेतले. आईसह तो कार्यालयात आला. पुढे काय करणार? असं विचारलं तर तो म्हणाला, 'काही नाही..लढणार!'. मग काय पोलीस  अधीक्षक यांच्या एका हाकेसरशी नंदुरबार पोलीसांची टीम कामाला लागली.  पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षक विजय पवार, पोलिस निरीक्षक कळमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निधी जमा केला. तब्बल 63 हजार रुपये जमा झाले. या रकमेचा चेक थरथरत्या हातांनी स्विकारत श्रेयसने नंदुरबार पोलीसांचे आभार मानले. 


रकमेतून आता श्रेयस एक तीन चाकी बाईक घेणार आहे. स्वत:च्या तीन चाकी बाईकवर झेरॅाक्सच्या दुकानात जाऊ शकेल. जन्मताच दुर्बल असलेल्या श्रेयसच्या पायात नंदुरबार पोलीसांनी बळ आणले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून घरी जाताना श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते. मागेही एका गरीब वृद्धास मदतीचा हात देऊन नंदुरबार पोलिसांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता.