Maharashtra Monsoon Updates : उकाड्यापासून त्रस्त नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले की, अंदमानमध्ये 16 मेपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 


27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणार
कश्यपी यांनी माहिती दिली की, 'हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 27 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतरच महाराष्ट्रात मान्सूनची नेमकी तारीख सांगता येईल. सर्व प्रकारची परिस्थिती आहे की मान्सूनच्या विषुववृत्तीय प्रवाहावर परिणाम होऊ शकतो.


20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस
अनुराग कश्यपी यांनी सांगितले की, 26 मे ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. 20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 26 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. मान्सूनचा विषुववृत्त प्रवाह मजबूत आहे आणि तो वेळेवर पोहोचेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची नेमकी तारीख सांगणं शक्य नाही. मान्सूनची सुरुवात दरवर्षीच्या तारखांच्या आसपास असली तरी, महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस लवकरच सुरू होईल.


कोकण आणि मराठवाड्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार


17 ते 21 मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या