Agriculture News in Nandurbar : नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agricultural Produce Market Committee) मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ओल्या लाल मिरचीला (Red chilli pepper) आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी लाल मिरचीच्या दरात दुप्पट दरवाढ झाली आहे. सध्या लाल मिरचीला सर्वांधिक म्हणजे सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळं चटणीचा दर देखील दुप्पट होणार आहे.


नंदूरबार  राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा 


गव्हाच्या पाठोपाठ सर्वसामान्यांच्या जेवणात महत्वाचा घटक असलेल्या मिरचीच्या दरात मागच्या वर्षाचा दुप्पट दरवाढ झाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ असलेल्या नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ओल्या लाल मिरचीला आज पर्यंतच्या सर्वाधिक दर मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी नंदूरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असते. यावर्षी आतापर्यंत तीस हजार  क्विंटलहून अधिक मिरचीची खरेदी  झाली आहे. बाजार समितीत ओल्या मिरचीचे दर सरासरी प्रतिक्विंटल आठ हजारावर गेले आहेत. तर सर्वाधिक दर यंदा 12 हजार रुपये देण्यात आला आहे. दररोज शंभर ते दीडशे वाहनातून हजारो क्विंटल मिरची विक्रीसाठी नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. ओल्या लाल मिरचीचा दर अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.


आंध्र प्रदेशसह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही मिरचीच्या उत्पादनात घट होणार


राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळं यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळं मिरचीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील वर्षी नंदूरबार बाजार समितीत 2 हजार 500 ते 5 हजार पर्यंतचे दर होते. यावर्षी दर दुप्पट झाले आहेत. मिरचीचे भाव वाढल्यामुळं सर्वसामान्यांच्या किचनमधील मसाल्याचे पदार्थ आणि चटणी यांचे दरही वाढत आहेत. या हंगामात आठ हजारापेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड नंदूरबार जिल्ह्यात करण्यात आली होती. मागील वर्षी देखील मिरचीला चांगला भाव मिळाला होता, यावर्षी देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र सध्या चांगला भाव मिळून देखील शेतकऱ्यांमध्ये असमाधानीचं वातावरण दिसून येत आहे. कारण परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.   


महत्त्वाच्या बातम्या:


यशोगाथा! डाळींबाच्या शेतीतून वीस लाखांचे उत्पन्न; खडकाळ जमिनीवर बाग फुलवली