Vaishali Suryawanshi : दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी आमदार किशोर पाटील (Mla Kishor Patil) यांचा कडक शब्दात समाचार घेतला आहे. ज्यांनी तुम्हाला राजकारणाचा वारसा दिला त्यांच्याविषयी तुम्ही असं बोलता, खबरदार जर यापुढं माझ्या वडिलांचा फोटो वापरला तर...असा इशारा देखील वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचा बंडखोर भाऊ आमदार किशोर पाटील यांना दिला आहे. दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांनी त्यांचं दुकान बंद केलं, असं वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केल्याचे वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या. 


पाचोरा इथं उध्दव ठाकरे गटातर्फे उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंडखोर भाऊ किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. एक ते दीड महिन्यांपूर्वी पाचोरा शहरात झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आर. ओ. पाटील तात्यांनी त्यांचं दुकान बंद केलं, अस वक्तव्य केलं होतं असे सुर्यवंशी म्हणाल्या. यावर बोलताना वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, तात्यांनी कधी कोणतं दुकान उघडलंच नव्हतं, मात्र ज्यांनी तुम्हाला राजकीय वारसा दिला, आमदार केलं, त्या आर. ओ. तात्यांवर सुध्दा तुम्ही टीका करता. तर मग कशासाठी तुम्ही त्यांच्या फोटोचा आधार घेता. खबरदार जर यापुढे तात्यांचा फोटो वापरला तर.. स्वतःच्या बलबुत्यावर यापुढं राजकारण करा, असा इशारा वैशाली सूर्यवंशी यांनी आपला भाऊ आणि शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना दिला.


किशो पाटलच्या संभ्रमात अडकू नका


तुम्ही तात्यांच्या विचारांवर चालणार नाही, त्यांच्या तत्वावर चालणार नाही तर त्यांचा फोटो वापरण्याचं तुम्हाला अधिकार नाही. तात्यांनी तुम्हाला सर्व उभं करुन दिलं होतं. आता यापुढे तुम्ही तुमच्या स्व:ताच्या बलबुत्यावर उभं करा. या तात्यांचे फोटो वापरुन हे तुमच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. या संभ्रमात तुम्ही अडकू नका, असं आवाहनही वैशाली सूर्यवंशी यांनी उपस्थित नागरिकांना केले. एकीकडं माझ्या हातून राखी बांधून माझं रक्षण करण्याचं वचन देतात अन् दुसरीकडे भाऊ येवो की बहीण येवो तिला आडव पाडीन असं वक्तव्य आमदार किशोर पाटील करतात. यावरुनच  रक्षाबंधन करुन आमदार किशोर पाटील हे फॉर्म्यालिटी करत आहेत, अशीही टीका वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर केली.