नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पूर (Rover Flood) आला आहे. त्यामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नवापूर तालुक्यातील (Navapur) करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत फत्तेपूर वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदीतून चार पाच फूट पाण्यातून जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना जावे लागत असल्याचा समोर आलं आहे.
नाशिकसह (Nashik) विभागातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश भागात कालपासून पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पुलाची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी गावाजवळची असलेल्या वस्तीवर जाण्यासाठी येथील नेसू नदीला (Nesu river Flood) आलेल्या पुरातून नागरिक प्रवास करत आहेत. गावातील शाळेकरी विद्यार्थ्यांना खांद्यावर बसून पालकांना नदीतून धोकादायक पद्धतीने मार्गस्थ व्हावे लागत आहे.
नवापूर तालुक्यातील करंजाळी गावातील ही समस्या गेल्या 70 वर्षांपासून सुरु आहे. आजपर्यंत गावातील दोन वस्तींना जोडणारा पूल (Bridge) तयार होऊ शकला नाही. ग्रामस्थांनी या गावात पूल तयार करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नेसू नदीला पूर आला असता काही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून नदीतून जाताना दिसून येत आहे. करंजाळीतील फतेपूर वस्तीत जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने नदीतूनच यांना मार्गस्थ व्हावे लागते. गावकऱ्यांसह पालकांच्या खांद्यावर बसून येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदी पार करावी लागत आहे. करंजाळी गावातून नेसू नदी गेली असून गावाचे दोन भाग झाले आहे, एका भागातून दुसऱ्या भागात रस्ता नसल्याने गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नदीच्या पाण्यातून जीवघेणा शालेय प्रवास
दरम्यान अनेकदा रुग्णालयात जाण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणारे दळण, किराणा वगैरे साहित्य हे कुठून आणावे, हा फार मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीही या नदीच्या पुरामधून नागरिक दळण किराणाला मुख्य गावात जीव धोक्यात टाकून येत आहेत. या विषयांवर आजपर्यंत कुठल्याच अधिकारी व लोकप्रतिनिधिंनी निधी व छोटे खाणी पूल या ठिकाणी उभारले नाही. त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील शालेय नुकसान होत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी या नेसू नदीवर छोटा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ये-जा करण्यासाठी पूलाअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा शालेय प्रवास करावा लागतोय. या दरम्यान, कुठलीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहिल? असा सवाल ग्रामस्थ यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाची बातमी :
Sarangkheda Tapi River Bridge: धुळे नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाची बिकट अवस्था