नंदुरबार : शहरातली मंडळी एका फोन कॉलवर पीन पासून प्लेनपर्यंत सगळ्याचं बुकिंग करतात. मात्र ग्रामीण महाराष्ट्राला आजही अँब्युलन्ससारख्या मुलभूत सुविधांसाठी झटावं लागतं. एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं झालं तर बँब्युलन्स मागवावी लागते. मात्र या बँब्युलन्सच्या मागे मृत्यूही धावत असतो.


 
शहरांच्या पलिकडेही एक जग आहे. जिथं फक्त चालते बॅम्ब्युलेन्स.. आजारी व्यक्तींना चादरीत ठेऊन बांबूला बांधून नेतात... अखंड प्रवास... घाटातून उतरताना... घाट चढताना.. पाठीमागे आईविना रडणारं पोरही असतं.

 
सातपुड्यातल्या तोरणमाळच्या दऱ्याखोऱ्यातला हा संघर्ष मोबाईलवर नंबर डायल करून पिझ्झा मागवणाऱ्यांना कळणार नाही... जिथे धड रस्ते नाहीत... तिथं कसली आली आहे अँब्युलन्स... म्हणून मग बॅम्ब्युलन्स

 
कधी कुणाचा अपघात होतो... कुणी आजारी पडतो... जवळचा दवाखाना किमान 30 किलोमीटर दूर... सगळेच रुग्णालयात पोहोचतात असे नाही.. बऱ्याचदा प्रवास सुरु होतो... पण बांबूच्या आधारे जगणारा देह तग धरतोच असे नाही. बालकाला जन्म देण्यासाठी तिरडीवर नेताना पाहिल्याचंही काही जण सांगतात. मांझीचं दुःख आणि हे दुःख सारखंच आहे.

 
रस्ते असूनही मेलेल्या माणुसकीमुळे ओडिशातल्या मांझीला आपल्या बायकोचं प्रेत खांद्यावर वाहावं लागलं आणि अख्खा देश शरमला. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये आज असे अनेक मांझी आहेत. जे दुर्दैवाची प्रेतं रोजच्या रोज खांद्यावर वाहतात... प्रश्न एकच आहे... तोरणमाळच्या दुर्दैवाचे दशावतार रोखण्यासाठी सरकार आता डोंगर फोडून रस्ता बांधणाऱ्या दशरथ मांझीची वाट पाहणार का?