नांदेड : मतिमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कोणी तयार नसल्यामुळे धाकट्या बहिणीने मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्याशी लग्न करायचं असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावं, अशी अटच तिने घातल्यामुळे युवकाने दोघी बहिणींशी विवाह केला.


नांदेडमध्ये बिलोली तालुक्यातील कोटग्याळ गावात 2 मे रोजी हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.

कोटग्याळमध्ये राहणाऱ्या गंगाधर शिरगिरे या अल्पभूधारक शेतकऱ्याला तीन मुलीच आहेत. मोठी मुलगी धुरपता ही जन्मापासून आजारी असायची. ती मतिमंद असल्याने तिच्या लग्नाची चिंता आई-वडिलांना लागली होती. आतापर्यंत दोन एकर शेती विकून वडिलांनी तिच्यावर उपचार केले.

धाकटी मुलगी राजश्री हिच्यासाठी स्थळाची पाहणी सुरु होती. तिच्या आत्याचा मुलगा साईनाथ उरेकर याच्यासोबत राजश्रीचा विवाह ठरला.

मतिमंद बहिणीसोबत लग्न केलं तरच आपण लग्नाला तयार आहोत, अशी अट राजश्रीने साईनाथला घातली. त्याने ती अट मान्य केली आणि एकाच मंडपात या दोन्ही बहिणीचा विवाह तरुणासोबत थाटात संपन्न झाला.