नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दररोज कोरोना बाधित रुग्णसंख्या ही दोन किंवा चार अशी होती. आज या कोरोना रुग्णवाढीने अचानक उसळी घेत धडकी भरवणारा आकडा गाठलाय. कारण आज प्राप्त झालेल्या 1 हजार 32 अहवालापैकी 45 जणांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचा आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. 


जिल्ह्यात नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे तीन बाधित रुग्ण आढळले आहेत. आजवर जिल्ह्यात  एकुण बाधितांची संख्या 90 हजार 646 एवढी झाली असून यातील 87 हजार 888 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 103 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 


जिल्ह्यात आजपर्यंत बाधित मृत संख्या 2 हजार 655 एवढी आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराची चळवळ सुरु केली आहे.  जनतेने या चळवळीत सहभाी होऊन मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर हे नियम पाळावेत आणि लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करावी असा हेतू आहे. 


प्रशासनाची शून्य अंमलबजावणी
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाने आवाहन जरी केले असले तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी मात्र शून्य आहे. कारण जिल्हाभरात 144 कलम लागू असताना बाजारपेठेत, मॉलमध्ये, चित्रपटगृह, लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्या जात आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून नियम फक्त कागद काळे करण्यासाठीच वापरले जात आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केल्यास या वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवता येईल.


महत्त्वाच्या बातम्या :