नांदेड: कोरोना संसर्गाने आठ महिण्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला 29 डिसेंबर रोजी दुसरा डोस दिला असल्याची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघड झाला आहे. आरोग्य विभागाच्या तुघलकी कारभाराने जिल्ह्यात कळस गाठलाय. तर महाराष्ट्रात नांदेड जिल्हा कोरोना लसीकरणाच्या यादीत खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे लसीकरणात गती आल्याचं दाखवण्यासाठी एक प्रकारे मृतांना देखील डोस देवून लसीकरण वाढविण्याचा तर प्रकार नाही ना? असा प्रश्न मयताच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित केलाय .


बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील शेतकरी हुलबा रामजी कोकणे (72) यांनी आदमपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात 2 एप्रिल 2021 रोजी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. कोकणे कुटुंबियांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यामूळे चार सदस्य उपचार घेत होते. हुलबा कोकणे यांना देखील सर्दी, ताप, खोकला हे कोरोनाचे लक्षण आढळून आल्यामुळे त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या उपचारादरम्यान 23 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला. कोकणे कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. मोठा मुलगा मारोती कोकणे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहू शकले नव्हते. 


दरम्यान, हुलबा कोकणे यांचा आठ महिण्यांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर 29 डिसेंबर 2021रोजी दुसरा डोस देण्यात आला कसा? आणि दिला कोणी? तो कसा दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


या घटनेविषयी बोलताना कुटुंबियांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. आरोग्य विभागाने आमच्या भावनेचा खेळ मांडल्याचे म्हटलंय. माझ्या वडिलांनी 2 एप्रिल 2021 रोजी आदमपूर तालुका बिलोली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला. आमच्या कुटुंबातील काहीजण पॉझिटिव्ह आले होते. वडील देखील पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. मी देखील पॉझिटिव्ह असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. वडिलांचे निधन होऊन आठ महिने झाल्यानंतर बुधवारी 29 डिसेंबर 2021 रोजी वडिलांनी दुसरा डोस घेतल्याचा मोबाईलवर संदेश व लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील मिळाले. ही बाब आम्हा कुटुंबियांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ आरोग्य विभागाने मांडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मयताच्या कुटुंबियांनी दिलीय. तसेच असे जिल्ह्यात किती प्रकार घडले असतील? याची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आलीय.


आरोग्य विभागाच्या या गलथान व भोंगळ कारभाराविषयी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इतनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलकंठ भोसीकर व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी सौ. वर्षा ठाकुर या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता लसीकरणाच्या या बट्याबोळा विषयी कोणीही बोलण्यास तयार नाहीये. राज्यात नांदेड जिल्हा यादीत वरुन 33 वा तर खालून तिसऱ्या क्रमांकावर लसीकरणाच्या यादीत आहे. तर जिल्ह्यामध्ये 2 हजार 655 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. त्यामुळे मयत हुलबा कोकणे यांच्याबाबतीत जे घडले असे जिल्ह्यात किती जणांच्या बाबतीत घडलेय का? याची चौकशी देखील होणे गरजेचे आहे.


महत्त्वाच्या बातम्या :